मुंबई -विधानसभा निवडणुकीमुळं सध्या महाराष्ट्रात प्रचाराचा जोरदार धुरळा उडत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय. तर प्रचाराच्या तोफासुद्धा धडाडू लागल्यात. मात्र जपानसारख्या प्रगतिशील आणि विकसित देशात एका मराठी माणसाने राजकीय क्षेत्रात झेंडा रोवलाय. मूळचे अंबरनाथ येथील योगेंद्र पुराणिक हे जपानमध्ये एक टर्म म्हणून आमदार राहिलेले आहेत. योगेंद्र पुराणिक हे सध्या भारतात आले असून, "ईटीव्ही भारत"ने त्यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत घेतलीय. भारत आणि जपान यांच्यातील परराष्ट्र संबंध, दोन देशांमधील राजकीय पार्श्वभूमी, शिक्षण आणि आरोग्य आदी विषयावर त्यांनी दिलखुलासपणे बातचीत केलीय. यावेळी भारतीय राजकारण आणि जपानमधील राजकारण याच्यामध्ये मोठी तफावत आहे. जमीन-अस्मानचा फरक असल्याचं जपानमधील माजी आमदार योगेंद्र पुराणिक म्हणालेत.
जपान शिस्तप्रिय देश :आपला जपान देशात प्रवास कसा सुरू झाला? यावर बोलताना माजी आमदार योगेंद्र पुराणिक म्हणाले की, मी 1990 साली पहिल्यांदा जपान देशात गेलो. सुरुवातीला विद्यार्थीदशेत असताना सामाजिक कार्याची आवड लागली. त्यानंतर खासगी क्षेत्रात नोकरी केली. हळूहळू जपानमधील राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश मिळविला. त्यानंतर मी पहिल्यांदा आमदार झालो. आमदार झाल्यानंतर भारतातील राजकारण आणि जपानमधील राजकारण यातील मोठा फरक मला जाणवू लागला. भारतात प्रचारात मोठा गाजावाजा केला जातो. सत्ताधारी-विरोधक हे वैयक्तिक पातळीवर जाऊन आरोप करतात. मात्र जपानमध्ये असे काही होत नाही. जपानमध्ये खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात नाही. इथे प्रचारसुद्धा ठराविक वेळेत करावा लागतो. जनतेला त्रास होणार नाही, याची दखल घेतली जाते. तसेच निवडणुकीच्या काळात सत्ताधारी-विरोधी पक्षातील उमेदवार एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करत नाहीत. जपान हा देश खूप छोटा असला तरी खूप शिस्तप्रिय आणि चांगला असल्याचंही योगेंद्र पुराणिक यांनी अधोरेखित केलंय.
भारतीय राजकारणाची चर्चा नाही : भारतात राजकारणासाठी भरपूर पैसा आणि वेळ खर्ची घालावा लागतो. इथे राजकारणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. परंतु जपानमध्ये भारतीय राजकारणाची चर्चा होत नाही किंवा भारतीय देशात राजकीय क्षेत्रात ज्या घडामोडी घडतात, त्याची चर्चासुद्धा होत नाही. कारण जपानवासीयांना चर्चा करण्यास तेवढा वेळ नसतो. मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलेलं आहे, त्याबाबत थोडीफार चर्चा होते. मात्र एकनाथ शिंदेंनी जे बंड केले त्याची कोणतीच चर्चा जपानमध्ये दिसली नाही. भारत आणि जपान ह्या दोन देशात पहिल्यापासून चांगले संबंध आहेत आणि भविष्य काळातदेखील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही पुराणिक यांनी व्यक्त केलाय.