मुंबई Worli Spa Murder Case : वरळी येथील डॉ. ई मोजेस रोडवर असलेल्या सॉफ्ट टच नावाच्या स्पामध्ये गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे या व्यक्तीची हत्या झाल्याने खळबळ उडाली. वाघमारेंची कात्रीने गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपींचा वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस देखील शोध घेत होते.
'जीपे'मुळं आरोपी सापडला : सॉफ्ट टच स्पामध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास हत्या करून वाघमारे आणि त्याच्या मैत्रिणीला शटर लॉक करून अज्ञात आरोपी फरार झाले होते. मात्र, अपर्णा बारबाहेर असलेल्या पानटपरीवर मोहम्मद फिरोज अन्सारी याने ७० रुपयांना दोन गुरखे खरेदी केले असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली. त्यावेळी पोलिसांनी पानटपरी विक्रेत्याला फिरोजने ७० रुपये कसे दिले विचारले असता 'जीपे'द्वारे दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पानटपरी विक्रेत्याकडून फिरोजचा जीपे क्रमांक घेतला आणि तो मोबाईल क्रमांक पोलिसांनी ट्रेस केल्यानंतर फिरोजला नालासोपाऱ्यातून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.
गुरुसिद्धप्पा वाघमारे याच्या मैत्रिणीसह स्पाच्या इतर दोन कर्मचाऱ्यांसोबत सायनमधील अपर्णा बारमध्ये मंगळवारी रात्री पार्टी झाल्यानंतर वाघमारेच्या ह्युंडाई ऑरा या कारचा फिरोज आणि साकिब हे ऍक्टिव्हावरून पाठलाग करत होते. ऍक्टिव्हावरून फिरोज आणि साकिब हे वाघमारेला सायनला बारमध्ये पोहचेपर्यंत तसेच बार ते वरळीतील स्पापर्यंत पाठलाग करत होते.
फिरोज हा नालासोपाऱ्यातील असून साकिब हा दिल्लीत राहणारा आहे. शेरेकर याने तीन महिन्यांपूर्वी फिरोजला ६ लाखांची सुपारी दिली होती. या ६ लाखांपैकी ४ लाख फिरोजने साकिबला दिले आणि वाघमारेचा काटा काढायचा कट रचला. तीन महिन्यांपासून साकिब याने वरळीतील स्पाची रेकी केली होती. हत्येपूर्वी चार ते पाच दिवस आधी मुंबईतील उपनगरातून फिरोज आणि साकिब या दोघांनी ७ हजार रुपयांना कात्री खरेदी केली होती. वाघमारेचा गळा चिरून नंतर या दोघांनी स्पामधून पळ काढला होता. गरीबरथ या लांब पल्ल्याच्या ट्रेनने साकिब विरार येथून दिल्लीला फरार झाला होता. रेल्वे पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी साकिबला ट्रेनमधून ताब्यात घेतले.
महिलेला वाघमारेने दिल्या होत्या भेटवस्तू : सायन येथील अपर्णा बारमध्ये मंगळवारी रात्री वाढदिवसाची पार्टीसाठी वाघमारे याला त्याच्या मैत्रिणीने बोलावले. या मैत्रिणीची वाघमारेची ओळख मुलुंडमधील स्पामध्ये झाली होती. त्यानंतर या मैत्रीचे रिलेशनशिपमध्ये रूपांतर झाले होते. वाघमारेकडे सापडलेल्या डायरीत या मैत्रिणीला दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांची तसेच कपड्यांच्या भेटवस्तूंची देखील नोंद करण्यात आली असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.