अमरावती World Cancer Day 2024:कर्करोगामुळं दरवर्षी लाखो जणांचा मृत्यू होतो. जागतिक स्तरावर कर्करोग हा मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. मानवाचा शत्रू असणाऱ्या कर्करोगाशी लढण्यासाठी जागरूकता हेच खरे शस्त्र आहे. नव्या पिढीने अनेक व्यसनांपासून दूर राहून आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असा ध्यास धरला तर कर्करोगावर मात करता येते. 4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाचा समाजामध्ये कर्करोगाप्रती जागरूकता आणणे हाच खरा उद्देश असल्याचं, कर्करोग तज्ञ डॉक्टर नीरज मुरके यांनी म्हटलंय.
पुरुष आणि महिलांना होणारे कर्करोग: पुरुषांमध्ये फुफ्फुस प्रोस्टेट, कोलोरेक्टल, पोट आणि यकृताचा कर्करोग हा सर्वसामान्यपणे आढळतो तर महिलांमध्ये स्तन, कोलोरेक्टल, फुफ्फुस, गर्भाशय, सर्व्हायकल आणि थायरॉईड कर्करोग हा सामान्य आहे. शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, अस्थिमज्जा प्रत्यारोपण, लक्षीय औषधोपचार याद्वारे सामान्य कर्करोगावर उपचार होऊ शकतो. अलीकडं सरकारने सर्व्हायकल कॅन्सरवर नियंत्रण आणण्यासाठी एचपीव्हीएल ही लस अत्यल्प दरात उपलब्ध करण्याचा निर्णय घेतल्याचं डॉ. नीरज मुरके यांनी सांगितलंय.
तंबाखूजन्य सेवनामुळे एक तृतीयांश मृत्यू : कर्करोगामुळं जगात सर्वाधिक मृत्यू होत असताना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं होणाऱ्या कर्करोगाद्वारे, एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू कर्करोगग्रस्ताचे होतात. ही अतिशय गंभीर बाब आहे. बिडी, सिगरेट, गुटखा, पान आधी पदार्थाच्या सेवनामुळं कर्करोग होतो. यासोबतच मद्यपान, कुटुंबात कोणाला कर्करोग असेल तर कुटुंबातील इतर व्यक्तीला सुद्धा कर्करोगाचा धोका असू शकतो. वातावरण तसेच विशिष्ट विषाणूनद्वारे होणारे संक्रमण याद्वारे देखील कर्करोग होण्याची शक्यता आहे.