मुंबई: राज्य शासनाच्या महत्त्वाचा आणि महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग (Shakti Peeth Highway). या शक्तीपीठ महामार्गाच्या कामावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत बराच वाद पाहायला मिळाला होता. या कामाचा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली होती. गेल्या काही दिवसात शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला संथगती मिळाली होती. पण पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आल्यामुळं शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला गती मिळणार असून, लवकरच शक्तीपीठ महामार्गाची कामं जलदगतीनं सुरू करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सह्याद्री अतिथीगृहावर आढावा बैठक : आज (सोमवारी) सह्याद्री अतिथीगृह येथे सार्वजनिक बांधकाम तसेच विविध विभागातील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाच्या कामाबद्दल निर्देश दिले. या बैठकीला विविध खात्याचे मंत्री तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पर्यटनाला गती मिळणार :राज्यातील शक्तीपीठ महामार्गामुळं राज्यात दळणवळण सुविधा होईल. यामुळं अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याचबरोबर व्यावसायिकांना संधी निर्माण होतील. याबरोबर पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती मिळेल. पर्यटनाला चालना मिळून अर्थव्यवस्थेत वाढ होईल. त्यामुळं शक्तिपीठाच्या महामार्गाचं काम जलदगतीनं सुरू करण्यात यावं. दरम्यान, राज्यातील महामार्गाची उभारणी आणि रस्त्यांचे दर्जेदार जाळे याची व्यापकता वाढवली पाहिजे. त्यादृष्टीनं सार्वजनिक बांधकाम विभागानं नियोजन केलं पाहिजे. तसेच देवस्थान, धार्मिक स्थळे यांना जोडणारा आणि पर्यटन, उद्योग क्षेत्राला गती देणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाची उभारणी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.