मुंबई Thane Mulund Water Tunnel : मुंबईकरांना सुलभ आणि उच्च दाबानं पाणीपुरवठा व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. यातीलच एका प्रकल्पाचं काम सुरू झालं असून, या प्रकल्पामुळं पाण्याची चोरी आणि पाण्याची गळती अशा घटना कमी होणार असल्याचं महानगरपालिकेनं म्हटलंय. ठाण्यातील येवई, कशेळी ते पूर्व उपनगरातील मुलुंडपर्यंत 21 किलोमीटरचा जलबोगदा बांधण्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. या नवीन बोगद्यामुळं पाणीपुरवठ्याची क्षमता वाढणार असून विद्यमान पाइपलाइन बॅकअप म्हणून काम करेल, अशी माहिती महापालिकेनं दिलीय.
येवई जलाशय ते भिवंडी असा जलबोगदाही बांधणार :सदरीलप्रकल्पासाठी अंदाजे 4,500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात राबवला जाईल. यासंदर्भातील आदेश लागू करण्यात आले असून, महिनाभरात बोगद्याचं काम सुरू होईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे. कशेळी ते मुलुंडला जोडणारा हा प्रकल्प मुंबई-नाशिक महामार्गाच्या सध्या सुरू असलेल्या विस्तारीकरणाला पूरक ठरणार आहे. या लिंकशिवाय बृहन्मुंबई महानगरपालिका येवई जलाशय ते भिवंडी असा जलबोगदाही बांधणार, असं देखील महापालिकेनं म्हटलंय.
जलबोगद्याचं काम कधी पूर्ण होणार? : महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागानं मार्च महिन्यात येवई ते कशेळी 14 किमी आणि कशेळी ते मुलुंड 7 किमी लांबीचे बोगदे बांधण्यासाठी निविदा काढल्या होत्या. तब्बल सात महिन्यांनंतर महापालिकेनं बांधकाम सुरू करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली. पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बोगदे पूर्ण होण्यासाठी सहा ते सात वर्षे लागण्याची शक्यता आहे. हे दोन्ही नवीन प्रकल्प पाणी वाहतुकीची क्षमता वाढवण्यासाठी तसंच गळती आणि दूषित होण्यापासून रोखण्यासाठी डिझाईन केले गेले असल्याची माहिती देखील पालिकेनं दिली आहे.
'या' भागांसाठीही बांधणार भूमिगत बोगदे : मुंबई आणि ठाण्यात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. सध्याच्या जलवाहिन्या भूपृष्ठाला समांतर असल्यानं मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या फुटणे, पाणी चोरी, पाणी दूषित होणं अशा घटना घडतात. याला उपाय म्हणून 110 मीटर भूमिगत बोगदा बांधून पालिका यावर तोडगा काढणार आहे. याशिवाय, मरोळ आणि माहीम, मलबार हिल, क्रॉस मैदान, वेरावली, गुंदवली आणि भांडुप कॉम्प्लेक्ससह महत्त्वाच्या भागांना जोडणारे मोठे भूमिगत बोगदे बांधण्याच्या तयारीत पालिका असल्याचं प्रशासनानं म्हटलंय.
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता वेगानं होणार पाणी पुरवठा, ठाणे-मुलुंड जल बोगद्याचे कार्यादेश जारी - Mumbai Water Supply
Thane Mulund Water Tunnel : मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी जलबोगदा बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलाय. हा जलबोगदा तब्बल 21 किमी लांबीचा असणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (ETV Bharat)
Published : Sep 21, 2024, 9:52 AM IST
हेही वाचा -
- नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोरबे धरण भरलं; नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी केलं जलपूजन - Morbe Dam Overflows
- मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ओव्हर फ्लो; 16 दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Tansa Dam Overflow
- पावसामुळं अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांसाठी गुडन्यूज; 29 जुलैपासून मुंबईतील पाणी कपात रद्द - Mumbai Water Cut