मुंबई International Women Day 2024 : मायानगरी मुंबईत सायबर क्राईम गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळं महिलांनी सायबर क्राईमला बळी पडून नये, म्हणून मंजुषा परब या वरिष्ठ पोलीस निरीक्षक धडपड करत आहेत. मंजुषा परब या भायखळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 'खाकी वर्दीचा अभिमान वाटतो' असं त्यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं. "महिलांनी 30 टक्के आरक्षणाचा फायदा घेऊन पोलीस दलात सहभाग वाढवावा' अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या मंजुषा परब या 1992 पासून काळाचौकी-लालबाग परिसरात राहतात. अतिशय सक्षम आणि निर्भीडपणे मंजुषा परब या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पडतात.
थोरल्या बहिणीनं दिली प्रेरणा :मंजुषा परब या पोलीस अधिकारी महिलेला त्यांच्या थोरल्या बहिणीनं पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रेरित केलं. मंजुषा परब यांची थोरली बहीण 1989 यावर्षी एमपीएससी परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदी पोलीस दलात भरती झाल्या होत्या. गेल्या वर्षी त्या सेवानिवृत्त झाल्याची माहिती मंजुषा परब यांनी दिली. "आपल्या थोरल्या बहिणीनं आपल्याला पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रेरणा दिली," अशी माहिती पोलीस निरीक्षक मंजुषा परब यांनी दिली आहे. मंजुषा परब या 1995 मध्ये पोलीस दलात दाखल झाल्या. त्या गेली अनेक वर्ष आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत होत्या. गेल्या नऊ महिन्यांपासून मंजुषा परब या भायखळा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. मिश्रित वस्ती असलेल्या भायखळा परिसरात चांगल्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था मंजुषा परब राखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.