सातारा : माण तालुक्यात विवाहित महिलेनं आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावालगतच्या तलावात उडी मारुन जीवन संपवलं आहे. ही घटना समजल्यानंतर पतीनंही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या विवाहित महिलेनं आत्महत्या का केली, याचं कारण अद्यापही कळू शकलं नाही. या तिघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महिलेची दोन चिमुकल्या मुलींसह आत्महत्या :सातारा जिल्ह्यातील धामणी गावातील ऐश्वर्या स्वप्नील चव्हाण (वय 25) हिनं सोमवारी मध्यरात्री शिवानी (वय 3 महिने) आणि स्वरांजली (वय 6 वर्षे) या मुलींसह गावलगतच्या तलावात उडी मारून जीवन संपवलं. या घटनेची माहिती कळताच पती स्वप्नील बापू चव्हाण (वय 28) यानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याला म्हसवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं तो बचावला. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांना माहिती कळताच तलावाच्या काठावर मोठी गर्दी उसळली.