सातारा : राज्यात सत्तेवर असलेलं महायुतीचं सरकार सर्वच बाजूने अपयशी ठरत आहे. मोठा गाजावाजा करून सुरू केलेली 'लाडकी बहिण योजना' आता अनेक प्रकारची कारणे दाखवून बंद करणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झालाय का? हेही सत्ताधारी सांगत नसल्यानं या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
मोदी, फडणवीस सरकारच्या कारभारावर टीका: सातारा जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी, फडणवीस सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "देशाचा आणि महाराष्ट्राचा कारभार चार गुजराथी चालवत आहे. राज्यात अंबानी आणि अदानी तर देशात कोण आहेत? ते तुम्हाला माहिती आहे. मागील शिंदे सरकारनं अदानीला मुंबईतील कोट्यवधी रुपयांची हजारो एकर जमीन कवडीमोल भावाने देऊन राज्य आज कुठे नेवून ठेवलं आहे?", असा सवालही त्यांनी केलाय.
पदापेक्षा पक्षासाठी काम करा :सध्या काँग्रेस पक्षाचा संक्रमणाचा काळ आहे. अशा काळात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदापेक्षा काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी काम करण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
व्यक्तिशः भेटून अडचणी सांगा: पृथ्वीराज चव्हाण पुढं म्हणाले की, "सातारा जिल्ह्यात काँग्रेस सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकदिलानं काम करावें. ज्यांना अडचणी असतील त्यांनी मला व्यक्तीशः भेटून अडचणी सांगाव्यात. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. सामान्यांच्या वेदना, प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
हेही वाचा -
- पुण्यात 75 हजारांहून अधिक महिलांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी; लाडक्या बहिणीला लाभ मिळणार का?
- शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, लाडकी बहीण योजना बंद होणार? जाणून घ्या कारणं...
- लाडक्या बहिणींना 'दे धक्का'! पाच लाख महिला अपात्र; कारण काय?