मुंबई Devendra Fadnavis : मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरुन सध्या राज्यात वादंग उठलं आहे. सगेसोयऱयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यावरुन ते आक्रमक झाले असून, राज्यभरात मराठा समाजामध्ये जनजागृती करत रॅली काढत आहेत. काही दिवसांपूर्वी आरक्षणावरुन जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते्. त्या आरोपांना फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
राजकारणातून निवृत्ती घेईन : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना निर्णय घ्यायचा होता. पण, देवेंद्र फडणवीस यांनी खोडा घातला, असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता. "हाच प्रश्न जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारावा व त्यांनी जर का सांगितलं की मी मराठा आरक्षण निर्णयात खोडा घालत आहे तर मी पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्ती घेईन," असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटलांना दिलंय.
सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना : कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे. त्या निर्णयाबाबत मी त्यांच्या पाठिशी उभा असल्याचं फडणवीस म्हणाले. "कोणाताही मंत्री हा मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना मी पाठिंबा देतो. तसंच पूर्ण ताकदीनं मी त्यांच्यासोबत उभा आहे," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकार हे मुख्यमंत्री शिंदे यांनाच असल्याचं स्पष्ट केलं.
मराठा समाजासाठी आम्हीच निर्णय घेतले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे त्यांना आरक्षण देवू देत नाहीत. फडणवीस हे खोडा घालत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. हे आरोप देवेद्र फडणवीस यांनी फेटाळले आहेत. "मुख्यमंत्री हे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळं त्यांना सर्व अधिकार आहेत. मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी मी निर्णय घेतले होते, तर आता मुख्यमंत्री शिंदे हे या समाजासाठी निर्णय घेत आहेत. त्यामुळं असे खोटे आरोप पसरवणं बंद करा," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यानी मनोज जरांगे पाटलांना प्रत्युत्तर दिलंय.