मुंबई :महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या धडाकेबाज विधानांनी खळबळ उडवून देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर अखेर मौन सोडलंय. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी दिलखुलास मतं व्यक्त केलीत. निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली शांतता अनेक प्रश्नांना जन्म देत असल्याचं सांगत ठाकरे यांनी विशेषतः राज्यातील निवडणूक निकालांवर प्रश्न उपस्थित केलेत. बाळासाहेब थोरात यांचा पराभव आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या ऐतिहासिक विजयावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. राज ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या पक्षाला मते मिळाली होती, मात्र ती सर्व मते कुठेतरी गायब झालीत. मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला, त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नेते भाजपामध्ये गेलेत :विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, तेव्हा महाराष्ट्रात सन्नाटा होता, असे मी पहिल्यांदाच पाहिले. ज्या प्रकारचा जल्लोष, मिरवणुका निघायला हव्या होत्या, त्या झाल्याच नाहीत. असा कसा निकाल लागला हे लोकांनाच कळेना. जल्लोष होईल, कोणी तरी जिंकल्याचं अनेकांना वाटले, पण अशा निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसत नाही. निवडून आलेल्यांनाच विश्वास बसला नाही, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकालावरच बोट ठेवलंय. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ते नेते भाजपामध्ये गेलेत, असे सांगत भूमिका कोणी बदलल्या, याची अनेक उदाहरणे देऊन राज ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय.
पवारांच्या पक्षाला 42 जागा मिळाल्या : विधानसभा निवडणुकीचा निकाल, पक्षाची बदलती भूमिका, भ्रष्टाचाराचे आरोप अशा अनेक विषयांवरून राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, निवडून आले त्यांचे मला फोन आले, त्यांना शॉक बसलाय. भाजपाला 132 जागा मिळाल्या. यापूर्वी 105 आणि 2014 ला 122 जागा होत्या. पण अजित पवारांच्या पक्षाला 42 जागा मिळाल्या. यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? ज्यांच्या जीवावर अजित पवार, छगन भुजबळ यांनी राजकारण केले, त्या शरद पवारांचे फक्त 10 आमदार जिंकून आलेत. त्यांचे 8 खासदार होते. अजित पवार यांचा केवळ एक खासदार जिंकून आला होता. 4 महिन्यांमध्ये एवढा निकाल बदलतो का? असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय. लोकांनी आपल्याला मतदान केलंय. पण ते आपल्यापर्यंत आले नाहीत. ते मतदान कुठेतरी गायब झाले. अशा प्रकारे निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणूक घेऊच नका, असे राज ठाकरे यांनी सांगितलंय.
निकालाबाबत राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे :राजू पाटील यांचे गाव आहे. 1400 लोकांचे गाव आहे. या गावात राजू पाटील यांना किती मते मिळाली असतील? एकही नाही. अख्ख्या गावातून एकही मत मिळाले नाही. मराठवाड्यातला एक पदाधिकारी आहे. तो नगरसेवक होता. त्यावेळी त्यांना त्यांच्या भागातून 5500 मते मिळाली. आता विधानसभेसाठी त्याला फक्त 2500 मते मिळाली. बाळासाहेब थोरात हे 7 वेळचे आमदार. 70 ते 80 हजार मतांनी जिंकून यायचे. त्यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला.
छावा चित्रपटाबाबत काय म्हणाले राज ठाकरे? :संभाजीराजेंनी कधी तरी हातात लेझीम घेतलीही असेल. इतिहासाच्या पानात नाही पण, मनात तर असेल. लेझीम हा आपला पारंपरिक खेळ आहे. मी त्यांना म्हटले, एखााद्या गाण्यामुळे चित्रपट पुढे सरकतो की, केवळ सेलिब्रेशन आहे? ते म्हणाले, केवळ सेलिब्रेशन आहे. मग उगाच चित्रपट कशाला साईडला टाकता. लोक चित्रपट पाहायला जातील, तेव्हा औरंगजेबाने संभाजीराजेंवर केलेले अत्याचार डोक्यात ठेवून जातील. उगाच लेझीम वगैरे काढून टाका, असं मी त्यांना सुचविलंय.
सर्वांनी स्वार्थासाठी भूमिका बदलली :राज ठाकरेंनी देशातील पहिल्या निवडणुकीपासून आणीबाणीचा काळ आणि त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये काय घडले, हे सांगताना सर्वांनीच स्वार्थासाठी भूमिका बदलल्याचा दावा केलाय. जनसंघ ही आधी आरएसएसची राजकीय शाखा म्हणून समोर आली. आणीबाणीनंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी स्वत: पराभूत झाल्या होत्या. 1980मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या, त्यात इंदिरा गांधी पुन्हा विजयी झाल्या होत्या. जनसंघाचा भाजपा झाला. पुढे 1978ला शरद पवार यांची पुलोद ही आघाडी स्थापन झालीय. त्यात जनसंघ हा त्यात सहभागी झाला होता. त्याचवेळी शिवसेनेने काँग्रेसच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता. नंतर शरद पवार हे पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमधून ते बाहेर पडले आणि पुढे त्यांनी काँग्रेससोबत युती केली. या सर्वांनी स्वार्थासाठी भूमिकाा बदलली. मी कोणती भूमिका बदलली, असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय.