गुवाहाटीला आमदारांना मारहाण धाराशिव Air hostess molestation: गुवाहाटीला गेलेल्या आमदारांतील दोन आमदारांना कोणी प्रचंड मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोध घेण्याचा विषय आहे. गुवाहटीत ज्या हॉटेलमध्ये महाराष्ट्राचे आमदार थांबले होते, तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. परंतु स्पाईसजेट आणि इंडिगो या विमान कंपन्यांच्या काही रूम बुक करण्यात आल्या होत्या. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या या खोल्यामध्ये काही एअर होस्टेस राहात होत्या. हॉटेलच्या लिफ्टमध्ये या एअर होस्टेस जात असताना काहींचा विनयभंग करुन लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राने शोधले पाहिजे, असं वक्तव्य केलंय संविधान अभ्यासक कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी केले आहे. ते काल संध्याकाळी धाराशिव येथे निर्भय बनो या कार्यक्रमात बोलत होते.
धाराशिव जिल्ह्यातील परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने द्वेषमुक्त समाज आणि माणुसकीसाठी निर्भय बनो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दडपशाहीच्या विरोधात, लोकशाहीच्या रक्षणासाठी सत्य ऐकायला या असं आवाहन आयोजकांनी जनतेला कलं होतं. हा कार्यक्रम धाराशिव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या मैदानांवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी डॉ. विश्वंभर चौधरी आणि वकील असीम सरोदे वक्ते म्हणून आले होते.
देशातील कायदे कोणाचाही सल्ला न घेता वाटेल त्या पद्धतीने बदलणे सुरू झालंय. सेपरेशन ऑफ पॉवरचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे देशात भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या जाहिरातीवर तीन हजार कोटी पेक्षा जास्त खर्च देशाच्या तिजोरीतून केला आहे. हा पैसा देशातील नागरिकांचा आहे. अत्यंत वाईट पद्धतीने ईडीचा वापर करून पक्ष फोडले जात आहेत. आजवर ईडीने केलेल्या कारवाईत 2 टक्के देखील शिक्षा झाल्या नसल्याचे सरोदे यांनी सांगितले.
'इस बार चारसो पार'चा नारा भाजपाने दिला आहे. परंतु लोकशाहीत नागरिक सर्वोच्च असतात हे भाजपा विसरून गेली आहे. पैसे आणि दडपशाहीच्या मार्गाने पुन्हा सत्ता हस्तगत करू, असे यांना वाटत आहे, असेही सरोदे म्हणाले. राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडण्याचे अत्यंत घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. तेंव्हा भाजपाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीतून हद्दपार करावे लागणार आहे. भारतीय संविधान वाचवायचे असेल तर भाजपाचा पराभव करावा लागणार असल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -
- "घरात बसून काहीही होत नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
- मन हेलावून टाकणारी घटना! माय-लेकरांनी संपवलं जीवन; सर्वत्र हळहळ
- प्रकाश आंबेडकरांचं पंतप्रधान मोदींना चॅलेंज; म्हणाले, "माझ्या विरोधात...."