मुंबईAmol Kirtikar ED Investigation : मुंबई वायव्यचे ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अमोल कीर्तिकर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आज (8 एप्रिल) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अमोल कीर्तिकर फोर्ट परिसरात असलेल्या ईडी कार्यालयात दाखल झाले होते. खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तिकर यांची चौकशी ईडी कडून सात तास चौकशी पार पडली. दरम्यान अमोल कीर्तिकरांच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.
अमोल कीर्तिकरच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी :उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांची 27 मार्चला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषणा करण्यात आली आणि 28 मार्चला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावले असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, अमोल कीर्तिकर यांचे वकील ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते आणि त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी वाढीव वेळ मागितला होता. त्यानुसार ईडीने आज पुन्हा अमोल कीर्तिकर यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले आणि 8 एप्रिल रोजी ईडीच्या चौकशीला बोलावले. त्याप्रमाणे अमोल कीर्तिकर ईडीच्या चौकशीसाठी आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात बाहेर हजर झाले असता अमोल कीर्तिकर यांच्या जमलेल्या कार्यकर्त्यांनी "अमोल भैया आगे बढो, हम तुम्हारे साथ है" आणि "अबकी बार, अमोल भैया खासदार", "मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है", अशा घोषणा दिल्या.