मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना (Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana) महायुतीसाठी गेमचेंजर योजना ठरली. या योजनेमुळं महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं. त्यामुळं ही योजना क्रांतिकारक आणि ऐतिहासिक ठरली आहे. दरम्यान, या योजनेबाबत लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर डिसेंबरमध्ये सहावा हप्ता दिला होता. यानंतर नवीन वर्षात सातवा हप्ता कधी येणार? याबाबत लाडक्या बहिणी आस लावून बसल्या आहेत. मात्र, आता लवकरच जानेवारी महिन्याचा हफ्ता येणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.
1500 ऐवजी 2100 रुपयेचा हप्ता येणार? : महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण जर पुन्हा सत्तेत आलो तर, लाडकी बहीण योजनेत 1500 ऐवजी 2100 रुपयाचा हप्ता देऊ, म्हणजे 600 रुपये वाढ करून देऊ, असं महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळं सरकार आल्यानंतर डिसेंबरमध्ये नवीन सरकारचा पहिला हफ्ता 2100 रुपये मिळेल, अशी आशा सर्वांना होती. परंतु 2100 रुपये ऐवजी 1500 रुपयांचा हप्ता महायुती सरकारनं दिला आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीचा भ्रमनिरास झाला होता आणि लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या. त्यामुळं नवीन वर्षात तरी हे सरकारनं जे आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता करणार का? 1500 ऐवजी 2100 रुपयाचा हप्ता देणार का? याकडं लाडक्या बहिणी डोळा लावून बसल्या आहेत.
'या' दिवशी हप्ता येणार : दुसरीकडं नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? 15 तारीख ओलडून गेली, जानेवारीचा अर्धा महिना उलटून गेला तरी हप्ता येत नसल्यामुळं लाडक्या बहिणीमध्ये हप्ता कधी येणार? याची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे हा हप्ता 1500 मिळणार की, 2100 मिळणार? याबाबतही लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता असल्याची पाहायला मिळत आहे. दरम्यान, या योजनेतील जानेवारीतील महिन्यातील हफ्ता 26 जानेवारीच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल. तसेच फेब्रुवारी महिन्याचा हफ्ताही याच महिन्यात देण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यावर काम सुरु आहे. कारण मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळं फेब्रुवारी महिन्याचा हफ्ताही याच महिन्यात देण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळं आता 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात हफ्ता जमा होणार असल्यामुळं लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
हेही वाचा -
- लाडक्या बहिणींना मोठा धक्का; चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या अर्जांची होणार पडताळणी, अदिती तटकरेंची माहिती
- मुदत संपूनही 'या' तारखेपर्यंत भरता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज, पण पैसे किती मिळणार? - majhi ladki bahin yojana
- Lek Ladki Yojana : वयाच्या अठरा वर्षापर्यंत मुलींना मिळणार लाख रुपये; नेमकी योजना काय अन् कोण पात्र?