मुंबई :सध्या राज्यात विधानसभा निवडणूक 2024 ची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात महिला नेतृत्वाला संधी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. 288 आमदारांच्या सभागृहात फक्त 24 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. 1972 मध्ये राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 26 महिला आमदार निवडून गेल्या. विशेष म्हणजे 53 महिला उमेदवार त्यावेळी रिंगणात होत्या. त्यापैकी 26 जणींचा विजय झाला. 2019 च्या निवडणुकीत 239 महिला उमेदवार रिंगणात होत्या, त्यापैकी केवळ 24 जणींना विजयाचा गुलाल उडवण्याची संधी मिळाली.
विधानसभेत 1990 ला केवळ 6 महिला आमदार :विधानसभेत सर्वात कमी महिला आमदार 1990 मध्ये निवडून आल्या. यावेळी 148 जणींनी निवडणूक लढवली, त्यापैकी अवघ्या 6 महिलांना त्यावेळी विजय मिळाला. 1962 मध्ये राज्याच्या पहिल्या निवडणुकीत 36 महिला रिंगणात होत्या, त्यापैकी 13 जणी विजयी झाल्या. त्यावेळी विधानसभेत 263 सदस्य निवडून दिले जात असत. 1967 मध्ये 19 महिलांनी निवडणूक लढवली. त्यापैकी 9 जणींना आमदार म्हणून विधिमंडळात प्रवेश करण्याची संधी मिळाली.
आणीबाणीनंतर पडला नाही फरक :आणीबाणीनंतर 1978 मध्ये राज्यभरातून 51 महिलांनी निवडणूक लढवली. त्यापैकी 8 महिला विजयी झाल्या. 1980 च्या निवडणुकीत 47 महिला उमेदवार रिंगणात होत्या, त्यापैकी 19 महिलांना विजय मिळाला. 1985 मध्ये राज्यभरात 47 महिला उमेदवार निवडणुकीला उभ्या होत्या, त्यापैकी 16 महिलांना आमदार होण्याची संधी मिळाली. 1995 मध्ये 247 महिला उमेदवार रिंगणात होत्या, त्यापैकी केवळ 11 जणींना विजय मिळवता आला. 1999 मध्ये महिला उमेदवारांचं प्रमाण कमी होऊन 86 जणींनी निवडणूक लढवली, त्यापैकी 12 जणींनी विधिमंडळात प्रवेश केला. 2004 मध्ये 157 जणींनी निवडणूक लढवली, त्यापैकी 12 जणी आमदार म्हणून निवडून गेल्या. 2009 च्या निवडणुकीत 211 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 11 जणींना विजय मिळवता आला. 2014 मध्ये सर्वाधिक म्हणजे 277 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 20 महिलांना आमदारकीचा टिळा लावता आला. राज्यात आजपर्यंत ज्या महिला आमदार म्हणून विजयी झाल्या, त्यापैकी अनेकजणी राजकीय घराण्याशी संबंधित होत्या. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना विधिमंडळात पोचलेल्या महिला आमदारांची संख्या अत्यल्प अशीच आहे.