मुंबई Western Railway Disrupted :मुंबईच्या लोकल सेवेमागील शुल्ककाष्ठ काही संपण्याचं नाव घेत नाही. मागील दोन दिवसांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगाब्लॉकमुळं मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर आज (3 जून) बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. तांत्रिक बिघाडामुळं येथील अनेक लोकल या उशिरानं धावत आहेत. त्यामुळं चाकरमान्यांच्या आठवड्याची सुरुवातच लेट मार्कनं होणार असं चित्र दिसतंय.
बोरिवली हे उत्तर मुंबईतील सर्वात वर्दळीचं रेल्वे स्थानक असून येथून दररोज मोठ्या संख्येनं प्रवासी आणि चाकरमानी लोकलनं प्रवास करतात. मात्र, बोरिवली स्थानकात केबलमध्ये बिघाड झाल्यानं प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरून सोडण्यात येणाऱ्या उपनगरीय गाड्या स्थानकातच थांबल्या. त्यामुळं प्रवाशांचे हाल झाले. तर स्थानकातील उर्वरित प्लॅटफॉर्म 3 ते 8 वरुन गाड्या चालविल्या जात आहेत. एका रेल्वे प्रशासनानं सांगितलंय की, या ठिकाणी संचारबंदी करण्यात येत असून लोकलसेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्राधान्यानं दुरुस्तीचं काम सुरू आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन वरील पॉईंट क्रमांक 107, 108 आणि 111 बंद करण्यात आलाय. तसंच ओव्हरहेड वायर जोडणीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचंही रेल्वे प्रशासनानं म्हटलंय.