अमरावती -जिल्ह्यात एकाविहिरीला 12 दारं असल्यानं तिचं नाव बाराद्वारी पडलं असून, केवळ 12 दारं हेच या विहिरीचं वैशिष्ट्य नसून ही बाराही दारं विहिरीच्या आतमध्ये आहेत. तसेच विहिरीपासून पाच ते सहा फूट अंतरावर जमिनीच्या आत असणाऱ्या भुयारात पायऱ्यांनी उतरून विहिरीमध्ये जाऊन आगळं वेगळं वैभव पाहायला मिळतंय. विहिरीच्या आत असणाऱ्या एकूण 12 दारांमधून विहिरीच्या आतमध्ये खोलवर असणारं पाणी पाहता येतं आणि वर गोलाकार आकाश दिसतं. आतमध्ये चक्क दोन-तीन खोल्यांसारखी दालनं असून, मूर्ती नसणारं भव्य मंदिरदेखील या विहिरीत पाहायला मिळतं. विहिरीच्या टोकावर असणाऱ्या दगडांवर देवांच्या मूर्तीचं अतिशय सुबक कोरीव काम थक्क करणारं आहे. अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यात पवनी सक्राजी या गावात सातपुते यांच्या शेतात ही ऐतिहासिक विहीर आहे. 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शशांक लावरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट...
असं आहे विहिरीचं वैशिष्ट्य : ही विहीर काळ्या पाषाणासोबतच खरपाच्या साहाय्यानं बांधण्यात आलीय. विहिरीच्या वर उंचावर एक हौद आहे. दोन मोटीच्या सहाय्यानं या टाक्यांमध्ये मोठा दोरखंड लावून बैलांद्वारे पाणी ओढून साठवण्याची व्यवस्था केल्याचं इथे पाहायला मिळते. याच ठिकाणी दगडांवर भगवान विष्णू, राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. तीनमुखी दत्त हातात कमंडलू घेऊन असणारी मूर्ती दगडात अतिशय सुरेख कोरलेली आहे. यासोबतच लहान मुलाला घोडेस्वारी शिकवताना त्याचे वडील, घोड्यांवर चाललेलं सैन्य, नाक, तोंड, डोळे असणारा सूर्य, विविध फुलं यांसह अनेक दगडांवर फुलदाणी अतिशय सुबकरीत्या कोरलेली विहिरीवर पाहायला मिळते. विहिरीवरून पाहिलं तर आतमध्ये एखादा भव्य महल असावा असंच वाटतं. एकूण बारा दारं गोलाकार आकारात अतिशय सुंदररीत्या या विहिरीमध्ये दिसतात आणि वरून पाहताना या दारांच्या आत नेमकं काय असावं, असं कुतूहल निर्माण होतं.
विहिरीत उतरायला भुयारी रस्ता :ही विहीर पाहताना विहिरीत नेमकं उतरण्याची व्यवस्था कशी असावी, असं लक्षात येतं. मात्र नेमकं कुठून उतरता येईल हे अजिबात लक्षात येत नाही. विहिरीपासून अवघ्या चार ते पाच फूट अंतरावर एका छोट्याशा खड्ड्यात काही तुटलेल्या अवस्थेत असणाऱ्या पायऱ्या दिसतात. हा खड्डा म्हणजे विहिरीत उतरण्यासाठी असणारा भुयारी मार्ग असल्याचं यामध्ये उतरल्यावर लक्षात येतं. एक-दोन वळणं घेऊन या भुयारी मार्गानं खाली उतरल्यावर विहिरीच्या आतमध्ये एक अनोखं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला लक्षात येतो. विहिरीच्या आतमध्ये एक भव्य दालन असून, त्यामध्ये शिरल्यावर एकूण नऊ ठिकाणी गाभारे तयार केलेले दिसतात. वर पाहिलं तर नक्षीदार घुमट नजरेत भरतो. या मंदिरातील गाभाऱ्यांमध्ये देवांच्या मूर्तीची स्थापना करण्यापूर्वीच इथलं काम थांबलं असावं, असं जाणवतं. यासोबतच बाजूला एक छोटीशी खोली आहे. वर गोलाकार फिरता येईल, असा छानसा वरंडाच या विहिरीमध्ये दिसतो.
विहिरीतील एक मंदिर अपूर्ण : ही विहीर अंदाजे 140 वर्षांपूर्वीची असावी. आमच्या गावातील गोपाळराव सातपुते यांनी ही विहीर बांधली, असं सांगितलं जातंय. या विहिरीसोबतच त्यांनी गावात एक मंदिरदेखील बांधलं होतं. बारा दारं असणाऱ्या या विहिरीतदेखील मंदिर असावं, असं त्यांचं स्वप्न होतं. या भव्य विहिरीचं काम पूर्ण झालं असलं तरी या विहिरीत मंदिर बांधण्याचं काम अपूर्णच राहिलं, असं पवनी सक्राजी येथील रहिवासी पंढरी साबळे यांनी 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना सांगितलं. गावात असणारं सातपुते कुटुंब हे अतिशय श्रीमंत होतं. गोपाळराव सातपुते यांचे आजोबा सक्राजी यांच्या नावामुळेच आमच्या पवनी गावासमोर सक्राजी, असा उल्लेख केला जातो. पुढे सातपुते कुटुंबानं अरबट यांच्या घरातील एका मुलाला दत्तक घेतलं. आज ही विहीर तेव्हाचे सातपुते आणि आता अरबट यांच्या मालकीच्या शेतात आहे, असं देखील पंढरी साबळे म्हणाले.