सातारा Weather Update In Satara: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कायम असून साताऱ्या जिल्ह्यात संततधार सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागानं जिल्ह्यात 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केलाय. यामुळे जिह्यातील सर्व पर्यटनस्थळं तात्पुरती बंदी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा :जिल्ह्यात सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. यामुळे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं येतात. परंतु कोणत्याही प्रकारची जीवितहानी होवू नये, म्हणून पर्यटनस्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी कोयना धरणाचे दरवाजे ९ फुटांवरुन १० फूट करण्यात येणार आहेत. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोयना धरणात ८६ टीएमसी पाणीसाठा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी कोयना धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता धरणात 86 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी कोयना नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात येणार आहे.