महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"मरण पत्करू पण शरण जाणार नाही", उदय सामंतांच्या आमदार-खासदार फुटीच्या दाव्यावर ठाकरे गटाकडून पलटवार - SHIVSENA RECATION ON SAMANT

पुढील तीन महिन्यांनंतर ते शिवसेनेच्या कामाला सुरुवात करतील, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंतांनी दावोसमधून केलाय. मंत्री उदय सामंत यांच्या दाव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया येताहेत.

Thackeray group attacks Uday Samant claim
उदय सामंतांच्या दाव्यावर ठाकरे गटाकडून हल्लाबोल (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2025, 3:23 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेत. या निवडणुकीसाठी इन्कमिंग आणि आऊटगोइंग जोरदार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पुढील काळात आयाराम-गयारामांना ऊत येणार असून, शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. शिवसेना ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 4 आमदार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याचबरोबर अन्य पक्षांचे आणि काँग्रेसमधील माजी आमदार, माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनीही पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, पुढील तीन महिन्यांनंतर ते शिवसेनेच्या कामाला सुरुवात करतील, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंतांनी दावोसमधून केलाय. मंत्री उदय सामंत यांच्या दाव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया येताहेत.

लाज कशी वाटत नाही :मंत्री उदय सामंत यांच्या गौप्यस्फोटावर खासदार संजय राऊतांनी जोरदार प्रहार केलाय. महायुतीमध्ये पालकमंत्रिपदासाठी रस्त्यावर जाळपोळ अन् आंदोलनं केली जाताहेत, असा महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे. आयुष्यभर फोडाफोडी केली अन् स्वतःही फुटले. हे अस्वस्थ आत्मे आहेत. पवार साहेबांना यांनी भटकती आत्मा म्हटले होते, पण हे अस्वस्थ आणि लटकते आत्मे आहेत. कुठेतरी समाधान माना, ईव्हीएमचा आदर करा, ज्या ईव्हीएमच्या आधारे तुमचा विजय झालाय. आम्हीसुद्धा मानतो की, ईव्हीएमच्या आधारे आमचे आमदार निवडून आलेत. पण कुठेतरी या महाराष्ट्राची जी प्रतिष्ठा आहे ती सांभाळा, उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि तुम्ही दावोसमध्ये बसून त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना फोडण्याची भाषा करताय, तुम्हाला लाज वाटत नाही का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उदय सामंतांना विचारलाय.

मरण पत्करू पण शरण...: पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, घ्या आमची नावं घ्या, आम्ही फुटणार आहे, असं म्हणा, जे फुटायचे होते, त्यांनी शेण खाल्ले अन् ते फुटले. मी मरण पत्करेन, पण तुम्हाला शरण जाणार नाही, अशी आमची भूमिका आहे. आम्ही मराठी माणसाचा, मराठी मातीचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. आम्हाला बाळासाहेबांनी घडवलंय. त्यामुळे आम्ही तुम्हाला शरण जाणार नाही. उदय सामंत तिकडे दावोसमध्ये बसून काय करताहेत? त्यांचे काय चालू आहे? मी तर मागणी करतो की, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांना महाराष्ट्रात बोलावलं पाहिजे. ते तिकडे शिंदेंचे आमदार फोडायला गेलेत, असा पलटवारदेखील संजय राऊतांनी उदय सामंतांच्या खासदार-आमदार फुटण्याच्या दाव्यावर केलाय.

त्यांचे कोणते 'करार' चालतात? : दुसरीकडे मंत्री उदय सामंतांनी केलेल्या ठाकरे गटातील आमदार-खासदार हे शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या दाव्यावर महाविकास आघाडीतून नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार अरविंद सावंत यांनी उदय सामंतांचा दावा फेटाळून लावलाय. "ते उद्योगमंत्री आहेत... ते दावोसमधील गुंतवणूक महाराष्ट्रात आणायला गेलेत, पण दावोसमध्ये बसून आमदार-खासदारांना फोडण्यासाठी त्यांच्याकडून किती कोटी रुपयांचे करार झाले? किती कोटी रुपयांचे फोडाफोडीसाठी डील झाले? हे त्यांनी एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे, म्हणजे जनतेच्या डोळ्यात अंजन पडेल, अशी उपरोधिक टीका खासदार अरविंद सावंत यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना उदय सामंतांवर केलीय. दरम्यान, आमच्या 20 आमदारांपैकी आणि खासदांरापैकी एकही आमदार किंवा खासदार हा फुटणार नाही. ते उद्योगमंत्री आहेत म्हणून काहीही उद्योग करीत आहेत, अशी बोचरी टीका खासदार अरविंद सावंतांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर केलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details