पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील भोसरीच्या सद्गुरु नगर येथे पाण्याची टाकी कोसळल्याची दुर्घटना घटना घडलीय. सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झालाय. तर काही कामगार जखमी झाले आहेत. तसंच टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून बचावकार्य सुरू आहे. तसंच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
स्थानिकांच्या बिल्डरवर आरोप :सद्गुरु नगर परिसरात लेबर कॅम्पमधील कामगार राहत होते. स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय की, बिल्डरनं निकृष्ट पद्धतीनं काम करून पाण्याची टाकी उभारली होती. त्यामुळंच हा अपघात घडला. मात्र, आयुक्त शेखर सिंग यांनी स्पष्ट केलंय की दुर्घटना घडलेली पाण्याची टाकी महानगरपालिकेची नव्हती. त्यामुळं ही टाकी कोणी उभारली? याबाबत आता प्रश्न निर्माण झालेत. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.