महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटातील 'मडकी' रिकामी! हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण - Amravati Water Scarcity

Water Scarcity Increased In Amravati : राज्यात तापमानात प्रचंड वाढ झाली असताना, आता पाणीटंचाई अधिक तीव्र झालीय. त्यामुळं अनेक ठिकाणी पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागतंय. अशीच परिस्थिती मेळघाटातील 'मडकी' या गावातही बघायला मिळत आहे.

Water Scarcity Increased In Amravati
अमरावती पाणीटंचाई (Source reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 2:17 PM IST

अमरावती Water Scarcity Increased In Amravati : गावात टँकर आला की पाण्यासाठी लगेच सुरू होणारी पळापळ, यासह गावात नळ योजना असून देखील विजेचा पत्ता नसल्यामुळं गावापासून तीन-चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विहिरीकडं लहान मुलं, तरुण आणि महिलांची दिवसभर सुरू असणारी धावपळ असं चित्र सध्या मेळघाटातील अनेक गावात पाहायला मिळतंय. चिखलदरापासून काही अंतरावर असणाऱ्या 'मडकी' या गावातील पाणी प्रश्नासंदर्भात 'ईटीव्ही भारत' नं नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. पाणी हवं तर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विहिरीकडं धाव घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा 'मडकी' गावात राहणाऱ्या गावकऱ्यांनी ईटीव्ही भारत समोर मांडली.

अमरावती पाणीटंचाई (Source reporter)

अशी आहे मडकी गावातली परिस्थिती : परतवाडा ते चिखलदरा मार्गावर असणाऱ्या मडकी या गावात 2015 पूर्वी पाण्याची भीषण टंचाई होती. 2015-16 मध्ये गावापासून तीन किलोमीटर अंतरावर पाणीपुरवठा विभागानं विहीर खोदली. या विहिरीतून गावात पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. गावात दोन दिवसाआड पाणी यायला लागलं. मात्र, आता उन्हाळ्याच्या दिवसात वीज पुरवठा खंडित केला जात असल्यानं पाणीपुरवठा थांबला. यामुळं ग्रामस्थांना गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या विहिरीवर हंडे, कोठी, ड्रम घेऊन जाणं हाच एकमेव पर्याय उरला. अधून-मधून नळाला पाणी येत असलं तरी त्याची शाश्वती नसल्यानं ग्रामस्थ पायपीट करून पाणी भरतात, अशी माहिती मडकी येथील रहिवासी नामदेव चव्हाण यांनी 'ईटीव्ही भरत' शी बोलताना दिली.

आपल्या गावाजवळ विहीर हेच समाधान :मडकी येथील ग्रामस्थ भर उन्हात देखील डोक्यावर हंडे घेऊन तीन किलोमीटर अंतरावरील विहिरीवरून पाणी भरतात. आपल्या गावात विहीर असल्यामुळं आपल्याला पाणी मिळतं. मात्र, इतर गावात विहिरींना पाणीच नाही. काही गावात तर विहिरीच नाही. यापेक्षा आपल्या गावात तीन किलोमीटर अंतरावर का होईना पाण्याची सोय तर आहे याचं समाधान मडकी येथील ग्रामस्थ व्यक्त करतात. पाण्यासाठी दिवसभरात तीन चार चक्कर मी मारतेच, असं मडकी येथील रहिवासी शिवानी धांडे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाली. शाळकरी विद्यार्थिनी असणाऱ्या शिवानीसह अनेक चिमुकले डोक्यावर दोन ते तीन हंडे घेऊन दिवसभर पाणी भरत असल्याचं चित्र मडकी या गावात पाहायला मिळालं.


प्रत्येक घरातील सदस्याला माराव्या लागतात किमान पाच चकरा :पावसाळा सोडला तर इतर सर्व दिवस पाण्यासाठी या विहिरीवर चकरा माराव्या लागतात. प्रत्येक घरातील सदस्य किमान पाच ते सहा वेळा पाणी भरण्यासाठी चकरा मारतो, अशी प्रतिक्रिया गावातील रहिवासी राम धांडे यांनी दिली. तसंच विहिरीतील पाणी स्वच्छ राहावं यासाठी यामध्ये नियमित ब्लिचिंग पावडर टाकण्याची जबाबदारी ही रोजगार सेवकाची असल्याचंही राम धांडे यांनी सांगितलं.

मेळघाटातील अनेक गावात परिस्थिती बिकट : सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटात मुसळधार पाऊस कोसळतो. मात्र, पावसाचं पाणी पूर्णतः डोंगरावरून खाली वाहून जात असल्यामुळं मेळघाटात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत मेघाटातील एकूण 325 गावांपैकी अनेक गावांमध्ये बाराही महिने पाणीटंचाई भासते. अनेक गावांमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावं लागत असल्याची परिस्थिती आहे. सध्याच्या घडीला मेळघाटात खडीमल बेला, मोथा, धर्मडोह, आकी, बहाद्दरपुरा आणि गौरखेडा बाजार या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. या गावांमध्ये कोरड्या पडलेल्या विहिरीमध्ये टँकरचं पाणी सोडलं जातं. टँकरचं पाणी विहिरीत टाकताच अवघ्या काही मिनिटातच ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी विहिरीवर तुटून पडत असल्यानं तासाभराच्या आत विहीर पुन्हा कोरडी होत असल्याची परिस्थिती या गावांमध्ये पाहायला मिळते.

हेही वाचा -

  1. पिण्याचं पाणी मागण्यावरुन झाली बाचाबाची अन् घरमालकानं घेतला मिस्त्रीचा जीव - Youth Killed In Nanded
  2. पाणीटंचाईची तीव्रता वाढली, राज्यातील दहा हजार गावे आणि वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा - Water Scarcity Increased
  3. लोकप्रतिनिधींकडून पन्नास वर्षांपासून 'आश्वासनांचा पाऊस', पालघरच्या ग्रामीण भागातील जनतेवर जंतुमिश्रित पाणी पिण्याची वेळ - Palghar Water Issue

ABOUT THE AUTHOR

...view details