मुंबई - Giant Killer Vasantrao Chavan : लोकसभा निवडणुकीच्या नांदेडमधील मतमोजणीस 4 जून रोजी आठ वाजता प्रत्यक्षात सुरुवात झाली. पहिल्यांदा ८ वाजता पोस्टल बॅलेटद्वारे झालेल्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएम मशीनवरील मतमोजणीस प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी साडेदहा वाजेच्या सुमारास पहिल्या फेरीचा अधिकृत निकाल जाहीर केला. प्रतापराव चिखलीकर यांना पहिल्या फेरीत १३८६ चे मताधिक्य होतं. त्यांना १९ हजार ५४३ मते तर वसंतराव चव्हाण यांना १८ हजार १५७ मतं होती. दुसऱ्या फेरीत चिखलीकरांना ३८ हजार ७२४ तर वसंतराव यांना ४२ हजार ७७३ मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत काँग्रेसला ४ हजार ४९ मतांची लीड मिळाली. त्यानंतर प्रत्येक फेरीमध्ये काँग्रेसचं मताधिक्य वाढतच गेलं. भाजपला केवळ पहिल्या फेरीतच मताधिक्य राहिलं. भाजपला एकतर्फी वाटणारी नांदेडची निवडणूक अतिशय चुरशीची झाली आणि त्यातही काँग्रेसचा दणदणीत विजय झाला.
दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्यापासून नांदेड हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. २०१४ च्या मोदी लाटेतही अशोकराव चव्हाण यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. परंतु, २०१९ च्या निवडणुकीत प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला. मात्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे स्वतः भाजपमध्ये असतानाही भाजपला विजय मिळवता आला नाही. भाजपच्या सर्वेक्षणात नांदेडची सीट धोक्यात असल्याचं दाखवलं गेलं होतं. त्यानंतर भाजपनं काँग्रेसचे बडे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनाच भाजपमध्ये घेतलं. त्यामुळे काँग्रेसकडे कोणीच उमेदवार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, भाजपची ही खेळी भाजपच्याच अंगलट आली आहे. चव्हाणांच्या प्रवेशानंतरही भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यासह बड्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभाही घेतल्या. त्याचाही भाजपला फायदा झाला नाही. अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं दुखावलेल्या मुस्लीम, दलित समाजाची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं नाही. तसंच मराठा आरक्षण आंदोलामुळे गावागावात मराठा समाजाकडून भाजपला झालेला विरोध काँग्रेसच्या पथ्यावर पडला आहे.
अतितटीच्या लढतीत आपण जायंट किलर ठरलात, विजयाचं श्रेय कुणाला द्याल? असं विचारलं असता वसंतराव चव्हाण म्हणाले, "खरं तर माझ्या विजयाचं श्रेय हे सर्वसामान्य मतदारांची एकी हेच आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न असो की बेरोजगारी, महागाई आणि भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली होती. त्यातून निर्माण झालेल्या संतापामुळे लोकांनीच ही निवडणूक हाती घेतली होती."
अशोकराव चव्हाण यांचा भाजप प्रवेश काँग्रेसच्या पथ्यावर पडला का ?
वसंतराव चव्हाण - आजपर्यंत नांदेड हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. सहकार, शिक्षण सर्वच क्षेत्रात अशोकराव चव्हाण यांची जिल्ह्यात पकड होती. परंतु, त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यांनी काँग्रेस का सोडली? या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच माहित. परंतु, त्यांनी कुणालाही विश्वासात न घेता भाजपमध्ये प्रवेश केला, ही बाब अनेकांच्या जिव्हारी लागली. विशेषतः मुस्लीम आणि दलित समाज जो कायम अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी राहिला, त्यांना हा निर्णय पचला नाही. त्यातून पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून ही विजयश्री खेचून आणली व नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला आहे, हे सिद्ध करून दाखवलं.
मराठा आंदोलक मनोज जरांगे फॅक्टरचा काय परिणाम वाटतो?
वसंतराव चव्हाण - मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेल्या जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी समाजाची दिशाभूल करणाऱ्यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केले होते, त्याचा आम्हालाही फायदा झाला.