पुणे Vanchit Bahujan Aghadi : गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी केलेल्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सामील करण्याबाबत चर्चा सुरू आहे. (Politics) अशातच आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलेलं नाही. एकूणच इंडिया आघाडीत वंचितला सामील करण्याबाबत अनेक मतमतांतर सुरू आहे. अशातच आज वंचित बहुजन आघाडीनं आम्हाला इंडिया आघाडी सोबत यायचंच आहे; पण आधी त्यांनी त्यांचं ठरवावं आणि मग आम्ही त्यांच्या घटक पक्षांशी चर्चा करू, असं जाहीर केलं आहे. (Maharashtra Politics)
48 जागांच्या बाबतीत आपापसात ठरवावं :वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पुण्यात आज पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. इंडिया आघाडीबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अॅड. प्रियदर्शी तेलंग म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीत सांगितलं जात आहे की, वंचितला सोबत घ्यायचं ठरलं आहे. पण, याबाबत तसेच त्यांच्या बैठकीबाबत कुठलंही निमंत्रण आम्हाला मिळालेलं नाही. इंडिया आघाडी बाबत कुठलीही चर्चा आमच्याशी झालेली नाही. आमची विनंती आहे की, जर महाविकास आघाडीला वंचितला सोबत घ्यायचं आहे तर त्यांनी लोकसभेच्या 48 जागांच्या बाबतीत आपापसात ठरवावं आणि मग आम्ही त्या त्या घटक पक्षाशी चर्चा करू आणि सहभागी होऊ. आम्ही जागेच्या बाबतीत 12 जागेचा फॉर्म्युला दिला होता; पण आता त्यांनी त्यांचं ठरवावं आणि मग आम्ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करतो असं यावेळी तेलंग यांनी सांगितलं.