चंद्रपूर :LOK SABHA ELECTION 2024 : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या तिकीटावरून प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातला वाद उफाळून आला होता. तिकीट जाहीर झाल्यानंतर देखील या निवडणुकीतही हा वाद कायम असणार असं चित्र होतं. विजय वडेट्टीवार हे प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांचा प्रचार करणार का? हा प्रश्न होता. यावर आज विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. प्रतिभा धानोरकर आणि कार्यकर्त्यांनी अजिबात शंका बाळगण्याचं कारण नाही. येत्या 9 तारखेपासून आपण प्रचाराला येणार असा शब्द त्यांनी प्रतिभा धानोरकर यांना दिला. प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होतं, यावेळी ते बोलत होते.
प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर : चंद्रपूर लोकसभा तिकीटावरून काँग्रेस पक्षात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे आपली कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी आग्रही होते. तर, पती बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या जागेवर प्रतिभा धानोरकर यांनी दावा सांगितला होता. (Chandrapur Lok Sabha) दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप झाले. त्यात दोघांनीही यासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. अनेक दिवस यावर चर्चा झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाली. परंतु, यानंतरही हे नाराजी नाट्य सुरुच होतं. गडचिरोली येथील महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विजय वडेट्टीवार उपस्थित होते. मात्र, प्रतिभा धानोरकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना ते आले नाहीत.
प्रचाराला येणार : गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या त्यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा त्यांनी आढावा घेतला. मात्र, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात ते फिरकले नाहीत. त्यामुळे धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार यांच्या वादाला आणखी बळ मिळालं. अशातच प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ आज काँग्रेस पदाधिकारी तसंच, घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यासाठी महाराष्ट्र राज्य निरीक्षक चैनी थाला रमेश, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी वडेट्टीवार बोलत होते. "प्रतिभाताई आणि कार्यकर्त्यांनी शंका बाळगण्याचं कारण नाही. आपण 9 तारखेपासून प्रचाराला येणार आहे", असा शब्द त्यांनी प्रतिभा धानोरकर यांना दिला.
मी म्हटलं तो निवडून येतोच :प्रतिभा धानोरकर ह्या निवडून येणाऱ्या खासदार आहेत, हे मी आत्ताच सांगतोय. विजय वडेट्टीवार ज्यांच्याबाबत असं बोलतो तो निवडून येतोच असंही वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, व्यासपीठावरून बोलताना वडेट्टीवार यांनी मुकुल वासनिक, चैनी थाला रमेश यांचं लक्ष वेधत वडेट्टीवार म्हणाले, यावेळी आपला खासदार निवडून येणार आणि काँग्रेसची सत्ताही येईल. मात्र, पूर्वी ही मी विरोधीपक्ष नेता होतो आणि आत्ताही आहे. त्यामुळे पुढच्यावेळी मला चांगलं मंत्रिपद द्यावं अशी विनंती देखील त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर केली.