पुणे (आळंदी) Alandi Crime :पुणे जिल्ह्यातील आळंदी येथरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथील नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत आळंदी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी संस्थेच्या (52वर्षीय) संचालकाला अटक केली आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून संस्थेचे संचालक दासोपंत ऊर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर-आळंदीकर (वय ५२) यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित संस्था चालवणाऱ्या तथाकथित महाराजाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
तीन महिन्यांपासून अत्याचार : संबंधित वारकरी संस्था खूप जुनी असून नुकतीच नोंदणीकृत झाली आहे. ही संस्था मृदुंग वादनाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेत शिक्षण घेतलं आहे. आरोपी दासोपंत उंडाळकर हा मूळचा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून, तीस वर्षांहून अधिक काळ आळंदीत वास्तव्यास आहे. पीडित तिन्ही विद्यार्थी परभणी जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी दासोपंत उंडाळकर यानं गेल्या तीन महिन्यांत पीडित विद्यार्थ्यांवर वारंवार अनैसर्गिक कृत्य केलं होतं. आज विद्यार्थ्यांचे पालक आळंदी पोलिसांत तक्रार देण्यासाठी आले होते. या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी पिंपरी पोलिस आयुक्त कार्यालयाला भेट दिली. आरोपी महाराज असल्यानं पोलिसांवर विविध स्तरातून राजकीय दबाव असल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात होती.