महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"राहूल बाबा मोदीजी..."; अमित शाहांची टीका, ठाकरे-पवारांवरही हल्लाबोल - AMIT SHAH ON RAHUL GANDHI

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 20 लाख घरांना मंजुरीपत्र आणि पहिला हप्ता शनिवारी अमित शाह यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

AMIT SHAH ON RAHUL GANDHI
राहुल गांधी आणि अमित शाह (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2025, 9:56 PM IST

Updated : Feb 22, 2025, 10:30 PM IST

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातून राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला जनधन अकाऊंट देत होते तेव्हा, राहुल गांधी म्हणत होते की, पंतप्रधान मोदी अकाउंट तर देत आहेत. मात्र, त्या अकाऊंटमध्ये काय देणार? पण आता राहुल बाबा मोदींजीचा चमत्कार बघा, १० लाख लोकांना एका क्लिकवर घराचा पहिला हप्ता त्याच अकाऊंटवर मिळाला आहे," असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

१० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा : पुण्यातील बालेवाडी स्टेडियम इथं शनिवारी 'प्रधानमंत्री आवास योजने'च्या लाभार्थ्यांच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना योजनेचा प्रथम हप्ता वितरण करण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या एका क्लिकवर १ हजार ५०० कोटी हे १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले असून एका लाभार्थ्याला १५ हजार रुपये देण्यात आले. या योजने अंतर्गत एकूण ३३ हजार लाभार्थी आहेत. त्यात पुण्यातील १९ हजार हे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आहेत. यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

CM, DCM यांचं केलं अभिनंदन : राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं अमित शाह यांनी अभिनंदन केलं. "देशात पहिल्यांदा असा प्रसंग घडला आहे की, एका वेळी २० लाख लाभार्थ्यांना योजनेचा लाभ होत आहे. आपण पाहिलं तर, अनेकदा सरकार आश्वासन देतं ते पूर्ण व्हायला वेळ लागतो. परंतु, मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमनं आज आश्वासन पूर्ण केलं आहे. आम्हाला विकसित भारत करायचा आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी घरे देण्याचा संकल्प केला. त्यांनी सर्वात जास्त घरे ही महाराष्ट्रला दिली आहेत. तसंच घरासोबत शौचालय, लाईट, सिलिंडर आणि धान्य देण्याचं काम केलं आहे. देशात आणि राज्यात अनेक विकास कामं सुरू आहेत. रेल्वे स्टेशन देखील नवीन होत आहेत. तसंच नागपूर आणि पुण्यात मेट्रोचं काम होत आहे," असं म्हणत शाह यांनी विकासकामांचा पाढाच वाचला.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर शाह यांची टीका : "मी महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानतो की त्यांनी महायुती सरकारला परत निवडून दिलं पण, महाराष्ट्रातील जनतेनं कोणती शिवसेना खरी आहे आणि कोणती शिवसेना खोटी आहे यासोबत कोणती राष्ट्रवादी खरी आणि कोणती राष्ट्रवादी खोटी हे पण जनतेनं दाखवून दिलं," अस म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.

राज्यात अनेक योजना सुरू : "२० लाख लाभार्थ्यांना पत्र दिलं आहे. राहिलेल्या १० लाख लोकांना पण आपण हप्ता देणार आहोत. १ लाख ६० हजार हफ्ता होता, त्यात अनुदान वाढवलं आहे. या योजनेत सोलर अनुदान वाढवलं आहे. आपल्याकडं अनेक योजना आहेत. यातून ५१ लाख घर देण्याचं काम राज्यात सुरू आहे. यासाठी ७० हजार कोटी रुपये आपण खर्च करत आहोत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

जिसका कोई नही उसका मोदी जी और अमित भाई शाह है : "घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आज २० लाख लोकांना घरे मिळत आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. मोदीजींच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे काम करत आहोत. या घराच्या सावलीत प्रेमाचा संसार फुलणार आहे. यात पंतप्रधान मोदी यांच्या प्रेमाची सावली आहे. 'जिसका कोई नही उसका मोदी जी और अमित भाई शाह है.' आपलं राज्य सरकार सिनियर सिटिझन यांनाही या योजनेत घेणार आहे. घरांची क्वालिटी चांगली असते. त्यामुळं लोक आपल्याकडं येतात. आज या कार्यक्रमाला लाडक्या बहिणी देखील आल्या आहेत. त्यांना मी सांगतो की कोणी काही म्हणले तरी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही," असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहिणींना दिलं.

महाराष्ट्राला सर्वाधिक घरं मिळण्यासाठी प्रयत्नशील : "मी एवढ्या लोकांना कधी एवढे घरे दिली नव्हती. आज १० लाख लोकांना घरं आपण देत आहोत. घरं असावं सर्वांना वाटतं आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. आपल्या राज्याला जास्तीत जास्त घरे मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारनं १०० दिवस कार्यक्रम हाती घेतला आहे. अनेक योजना यात सुरू आहेत. १०० दिवसाचं उद्दिष्ट नक्की पूर्ण करू. आज वेगळा कार्यक्रम होत आहे. तुमचं हक्काचं घर करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. तुम्ही पण सहकार्य करा, तसंच इथ लाडक्या बहिणी देखील आल्या आहेत तुम्ही टाकलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही," असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. 'जिथं उबाठाचा सरपंच तिथं निधी देणार नाही, बसा बोंबलत'; नितेश राणेंचा इशारा
  2. नितीन गडकरींच्या विभागानं बांधला पूल; उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी कोसळला स्लॅबचा तुकडा, भाजपा नेत्याचा पुत्र बालंबाल बचावला
  3. जालन्यात पुलाचं काम करणाऱ्या 5 मजुरांचा मृत्यू ; टिप्परनं शेडवर टाकली वाळू, आत झोपलेले मजूर ठार
Last Updated : Feb 22, 2025, 10:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details