मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी दिलीय. तसंच काँग्रेस सरकारच्या तुलनेत हा निधी तब्बल 20 पट अधिक असल्यानं महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना मोठी चालना मिळणार असल्याचंही ते म्हणालेत.
महाराष्ट्रातील रेल्वेसाठी इतक्या कोटींची तरतूद :या अर्थसंकल्पातून भारतीय रेल्वेला आणि महाराष्ट्राला काय मिळालं याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत दिली. त्यांनी सांगितलं की, "या अर्थसंकल्पात रेल्वेचे 2 लाख 52 हजार कोटी रुपयांचं बजेट आहे. तर, महाराष्ट्रातील रेल्वेसाठी तब्बल 23 हजार 778 कोटींची तरतूद करण्यात आलीय. महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीसाठी महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळं येथे रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात 2 हजार 105 किलोमीटरचे नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यात आलेत. हे ट्रॅक मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त आहे. याकरिता साधरणतः 1 लाख 70 हजार कोटी रुपये खर्च आलाय. तसंच राज्यातील 3 हजार 586 किमी ट्रॅकचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झालंय. यामुळं रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि पर्यावरणपूरक झालाय."
मुंबईतील लोकलला काय झाला फायदा? : मुंबई लोकल सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती देखील यावेळी रेल्वे मंत्र्यांनी दिली. यामध्ये बोरीवली-विरार पाचवी- सहावी मार्गिका, कुर्ला-सीएसएमटी पाचवी-सहावी मार्गिका, तसंच पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर यांसारख्या 301 किलो मीटर नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पांचा समावेश आहे. एकूण 16 हजार 400 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांमुळं मुंबई उपनगरीय रेल्वे अधिक वेगवान आणि प्रवासीसंख्या हाताळण्यासाठी सक्षम होणार असल्याचा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दिवसाला 3 हजार लोकल फेऱ्या धावत आहेत. पुढं उपनगरी वाहतुकीची क्षमता वाढल्यानं दिवसाला 300 अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.