मुंबई- इस्रायलवरील हल्ल्यात संयुक्त राष्ट्राचा हात असल्याचा संशय असून, यामध्ये संयुक्त राष्ट्राचे कर्मचारी आणि शिक्षक यांनी हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप इस्रायलचे भारतातील वाणिज्यदूत कोबी शोषणी यांनी केलाय, ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. तसेच कुठल्याही परिस्थितीत लेबनॉनमधून आम्ही आमचे लोक परत आणू आणि नक्कीच विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. तसेच भारताने केलेल्या समर्थनाबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केलेत.
इस्रायलवरील हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होतंय. इस्रायल आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. वास्तविक आम्हाला शांततेत जगायचे होते आणि आमच्या शेजाऱ्यांना तशी आशा निर्माण करून द्यायची होती. परंतु मनुष्यावर अनन्वित अत्याचार आम्ही पाहिलेत आणि ज्यू लोकांनी राष्ट्राचा काळा इतिहासही पाहिलाय, असे मत इस्रायलचे भारतातील राजदूत कोबी शोषणी यांनी व्यक्त केलंय. आम्ही एक लहान देश आहोत, प्रत्येकाने आता मृत्यू जवळून पाहिलाय. इस्रायलची 19 वर्षांची मुलगी जेव्हा गाझाच्या बोगद्यात मृतावस्थेत सापडली, तेव्हा सर्वांना धक्का बसला होता, तीन वर्षांच्या मुलीलाही मारण्यात आले, तर 50 मुलांचा बळी घेण्यात आलाय. अनेक स्त्रिया मारल्या गेल्यात, अनेकांवर बलात्कार करण्यात आलेत, तर काहींचा शिरच्छेद करण्यात आल्याचं आम्ही कधीही विसरणार नाही आणि क्षमा करणार नाही, असंही कोबी म्हणाले.
संयुक्त राष्ट्राचा हल्ल्यात हात:इस्रायलवर झालेल्या हल्ल्यामध्ये संयुक्त राष्ट्राचे सेक्रेटरी जनरल, कर्मचारी आणि शिक्षक यांनी हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप शोषणी यांनी केला. तसेच युरोपियन नेत्यांवरही त्यांनी कट्टरपंथी इस्लामिक गटांना मदत केल्याचा आरोप केलाय ही एक राजकीय चूक असून, या गटांनी आमच्या शब्दांना आमचा कमकुवतपणा समजू नये, असा इशाराही त्यांनी दिलाय. इस्रायलमध्ये सध्या 74000 निर्वासित असल्याचे त्यांनी सांगितलंय.