उज्जैनवरुन आलेल्या 32 वर्षीय तरुणाचे मुंबईत हात प्रत्यारोपण मुंबई Bilateral Hand Transplant In Mumbai : उज्जैन येथील स्टील फॅब्रिकेशन फॅक्टरीत काम करत असताना 32 वर्षीय जीवेश कुशवाहला हाय व्होल्टेज विजेचा शॉक लागला आणि या अपघातात त्याचे दोन्ही हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्याचा जीव वाचविण्यासाठी उजवा पाय आणि दोन्ही हात कापावे लागले. त्यानंतर त्यानं मुंबईतील परेलच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणाविषयीची माहिती घेतली. उपचारासाठी जीवेश कुशवाह आणि त्याच्या कुटुंबियांनी मुंबईच्या दिशेनं धाव घेतली. प्रत्यारोपण सर्जन डॉ. नीलेश सातभाई यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमनं ही दुहेरी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
कृत्रिम हातांचा फारसा उपयोग नाही : जीवेश कुशवाह याचा अपघात झाल्यावर त्याच्यावरील शस्त्रक्रिया ही फार गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक होती. ती जवळपास 12 तासांपेक्षा जास्त काळ चालली. डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या अपघातानंतर रुग्णाचे हात आणि पाय कापल्यानं रुग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णासाठी कृत्रिम अवयवांचा वापर करण्याचं ठरवलं. कृत्रिम उजव्या पायाच्या साहाय्यानं रुग्ण उभा राहू शकत होता. तसंच तो चालू शकत होता. मात्र, कृत्रिम हातांचा फारसा उपयोग होत नव्हता. बहुतेक कामांसाठी कृत्रिम हात निरुपयोगी ठरत असल्यानं रुग्णाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता. दैनंदिन कामासाठी त्याला आपल्या भावांवर अवलंबून रहावं लागत होतं. त्यानंतर अवयव प्रत्यारोपणाविषयी माहिती मिळाल्यावर जून 2022 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ग्लोबल हॉस्पीटलला भेट दिली.
एका महिन्यात ब्रेन-डेड दात्याकडून हात मिळाला : डॉ नीलेश सातभाई सांगतात की, "रुग्णाची तपासणी केल्यानंतर त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत दुहेरी हात प्रत्यारोपणाबद्दल चर्चा केली. जानेवारी 2024 मध्ये त्यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा धाडसी निर्णय घेतला. अचूक मूल्यांकन आणि नियोजन केल्यानंतर, आम्ही रुग्णाची हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली. त्यानंतर अवघ्या एका महिन्यात ब्रेन-डेड दात्याकडून हात मिळाला. दात्याचे हात जीवेशची शरीरयष्टी, रंग आणि बाह्य स्वरूपाच्या दृष्टीने अगदी योग्य ठरले."
शस्त्रक्रियेला लागले 13 हून अधिक तास : पुढं ते म्हणाले की, "ही शस्त्रक्रिया खरोखरच आव्हानात्मक होती. दाता आणि प्राप्तकर्ता या दोघांचा समन्वय साधणं अतिशय महत्वाचं होतं, कारण दात्याच्या हातांना सुरत ते मुंबई असा प्रवास करावा लागला आणि प्राप्तकर्त्याला उज्जैनहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करावा लागला. ही शस्त्रक्रिया 13 तासांपेक्षा जास्त वेळ सुरु होती. त्यानंतर रुग्णाला निरीक्षणाखाली अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. शस्त्रक्रियेनंतर 4 ते 5 दिवसांत रुग्णानं शारीरीक हलचालींना सुरुवात केली. तसंच फिजिओथेरपी देखील सुरू करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असली तरी रुग्णाला आजीवन इम्युनोसप्रेशनची गरज भासेल आणि त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागेल", असंही त्यांनी सांगितलं.
आता सर्व स्वप्न पूर्ण करायचे : या शस्त्रक्रियेबाबत बोलताना जीवेश म्हणला की, "मला माझा हात गमावणं म्हणजे स्वतःचा एक भाग गमावण्यासारखं होतं. आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर मला नैराश्याचा सामना करावा लागत होता. एखादी वस्तू पकडणं, कपडे घालणं, जेवण करणं, बूटाची लेस बांधणं, केस विंचरणं किंवा अगदी वैयक्तिक स्वच्छता या साध्या कृतीसाठी मी इतरांवर अवलंबून होतो. या नवीन हातांनी मला माझं स्वातंत्र्य आणि स्वाभिमान परत मिळवायचा आहे. मला माझी सर्व स्वप्नं आणि ध्येयं पूर्ण करायची आहेत. मी डॉ. सातभाई आणि त्यांच्या टीमचा सदैव ऋणी राहीन." तर जीवेशचा भाऊ मनोज कुशवाह म्हणाला की, "माझ्या भावाला हात प्रत्यारोपणाची गरज आहे हे कळाल्यावर, आम्ही परेलच्या ग्लोबल हॉस्पिटल्सकडं धाव घेतली. माझ्या भावाला खरोखरच एक नवीन आयुष्य मिळालंय आणि आम्हाला आशा आहे की त्याला लवकरच आयुष्याचा जोडीदारही मिळेल."
हेही वाचा -
- मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू करण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
- Transplantation on Young Woman Arm : जन्मत: दोष असलेल्या तरुणीच्या हातावर प्रत्यारोपण, तब्बल 13 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर मिळाला 'नवा हात'
- मोनिकावर दोन्ही हातांचे यशस्वी प्रत्यारोपण; म्हणाली...'आता मी मेंदी लावू शकेन'