मुंबई- राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष लागलंय. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीतील पक्षानी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यानंतर आता माजी नगरसेवकांचे इनकमिंग आणि आऊटगोइंग जोरदार सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या दारूण पराभवानंतर महाविकास आघाडीत नेत्यांच्या मोठ्या प्रमाणात बैठका होताना पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष हे मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतलीय. मुंबईतील शरद पवारांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. जवळपास या दोन नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय.
भेटीत नेमकी चर्चा काय? :दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागलाय. यानंतर महाविकास आघाडीची पराभवाची आत्मपरीक्षण करणारी बैठक झालेली नाही किंवा आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात कोणती बैठक झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची एक लवकरच बैठक घेऊन जे काही गैरसमज किंवा मतभेद असतील ते दूर करून महाविकास आघाडीत एकवाक्यता यावी, याबाबत लवकरच एक बैठक बोलावण्यात यावी, अशी चर्चा दोन नेत्यांमध्ये झाल्याची माहिती समोर येतेय. तसेच बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील हत्या प्रकरण तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याबाबतही दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीमधील मरगळ झटकून लवकरच एक बैठक घेण्यात यावी, महाविकास आघाडीमध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता यावी, यासाठी एक बैठक बोलवण्यात यावी, अशीसुद्धा दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय.
उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा? :विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडी गाफिल राहिली. त्यामुळे महायुतीला यश मिळाले आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला, असे बोलले जातेय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या दूर करून पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता निर्माण व्हावी, यासाठी आज दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार की महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय. परंतु एकीकडे ठाकरेंनी स्वबळाच्या नाऱ्याचे संकेत देत असताना दुसरीकडे शरद पवारांची घेतलेली भेटही महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीदरम्यान ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. तर शरद पवार गटाकडून जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार हे उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधी दिग्गज भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनीसुद्धा शरद पवारांची भेट घेतलीय.
उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, दोन नेत्यांमध्ये नेमकी चर्चा काय? - UDDHAV THACKERAY MET SHARAD PAWAR
महाविकास आघाडीतील पक्ष हे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच आज उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतलीय.
उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट (Source- ETV Bharat)
Published : Jan 20, 2025, 5:06 PM IST