मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सर्व चर्चांवर आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट सरकारला चॅलेंजच दिलंय. तसंच 'लाडकी बहीण यौजने'च्या अपात्र प्रकरणावरुन सरकारला खडेबोल सुनावलेत.
सगळेच तुमचे गुलाम नाहीत : "गद्दार होते ते निघून गेले. ज्यांनी गद्दारी केली त्यांची मनं मेली आहेत. तलवार कोणावर चालवत आहोत हेच त्यांना कळेनासे झाले. मग अशा वेळेला तुमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांचं कौतुक नाही करायचं तर मग कोणाचं करायचं? सुरज चव्हाण एक वर्ष तुरुंगात राहून आलाय. सगळेच काय तुमचे गुलाम नाही होऊ शकत आणि होणार नाही. गुलामी ही महाराष्ट्राच्या रक्तामध्ये नाही," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा : "तुमची सर्व यंत्रणा म्हणजे सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स हे बाजूला ठेवून मर्द असाल, हिंमत असेल तर एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा, तुमचं डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही," असं आव्हान उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलं. ठाकरेंचे खासदार फुटले जाणार अशी चर्चा होती, त्याला जोरदार प्रत्युत्तर ठाकरेंनी दिलं. अंबादास दानवे यांच्या आतापर्यंतच्या विधानपरिषद कार्यकाळातील 'शिवबंधन' या कार्य अहवालाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं.
5 लाख महिलांची फसवणूक : "लाडक्या बहीण योजनेत पाच लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. यांनी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे. मग आता लाडक्या बहिणींनी दिलेली मते वगळणार का?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. "लाडकी बहीण हुशार असून, फसवा कोण आणि खरा कोण हे ओळखते," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.
तुझा वाटा किती? माझा वाटा किती? :"राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. जे काही त्यांचं बहुमताचं ढोंग आहे ते त्यांनी फाडून टाकलं. कारण हा पराभव कोणालाच मान्य नाही. आपल्याला जसा पराभव पचलेला नाही, पटलेला नाही तसं त्यांना विजय सुद्धा पटलेला नाही. एवढं बहुमत मिळालं तरी सुद्धा मुख्यमंत्री कोण हे ठरवायला एक महिना लागला. मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणाला काय मिळणार? तुझा वाटा किती? माझा वाटा किती? त्यानंतर पालकमंत्री याला मिळणार की त्याला मिळणार? हे सुरु आहे. याला तुम्ही बाळासाहेबांचे विचार म्हणता? प्रत्येक वेळेला काही झालं की रुसूबाई रुसू आणि गावात जाऊन बसू," अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केली.
मराठी माणसाला हिंदुत्व शिकवू नये : "मी भाजपा सोडली आहे, हिंदुत्व नाही. यांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे की, माझ्या मतदार यादीत अचानक हा माणूस घुसला तो कोण आहे? कुठे राहतो? आता जे नोंदवले गेलेले मतदार आहेत, गेल्या वेळेला त्यांनी मतदान केलं असेल असं मला वाटत नाही. मग अचानक नवीन मतदार आले कुठून? यासाठी अभ्यास करावा लागेल आणि खूप मोठा संघर्ष करावा लागेल. लोकशाहीची हत्या म्हणतो ती हीच आहे. सगळ्या यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत म्हणून तुम्ही माझा पक्ष फोडता," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी पक्षांवर केला.
हेही वाचा -
- शिवसेना युबीटीचे सर्व खासदार खंबीरपणे ठाकरेंच्या पाठीशी - पक्षाच्या आठ खासदारांची संयुक्त पत्रकार परिषदेत ग्वाही
- ...तर भाजपाच्या खासदाराचा पराभव झाला असता, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
- वाघाची शिकार करताना उंदीर तरी हाती लागला का? सुषमा अंधारेंची 'ऑपरेशन टायगर'वर टीका