मुंबईUddhav Thackeray PC: आजपासून सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तेलंगाणा सरकारनं दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती आणि आता शेतकरी संकटात सापडला असताना अतिवृष्टी आणि दुष्काळाचं संकट शेतकऱ्यावर असताना यातून सरकारनं त्यांना बाहेर काढलं पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकांआधी कर्जमाफी दिली पाहिजे. त्याची अंमलबजावणी निवडणुकीपूर्वी केली पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि निवडणुकीला सामोरं जा, असं मी या सरकारला आव्हान देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे महायुतीचं शेवटचं अधिवेशन :पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सरकार लोकांची फसवणूक करत आहे. मोठमोठी आश्वासनं देतात, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही आणि आता यांचं शेवटचं अधिवेशन आहे. उद्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे; पण त्या घोषणांची पूर्तता करायलाच सरकार नसेल. हे सरकारचं शेवटचं अधिवेशन निरोप देणारं असेल आणि अधिवेशनातून त्यांना बाय-बाय करण्यात येईल, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला लगावला.
रोज शेतकरी आत्महत्या :राज्यात सरासरी रोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी आत्महत्या करणार नाही असं सरकारनं म्हटल होतं; मात्र आता सरकार शांत बसलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, मी शेतकरी आहे; पण ते हेलिकॉप्टरने जाऊन गावी शेती करतात. ते शेतीत अमावस्याला काय पिकवतात हे मला माहीत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. पीक विम्यात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. एक रुपयात पिक विमा मिळेल असं सरकारनं म्हटलं होतं; परंतु शेतकऱ्यांची या सरकारनं फसवणूक केली आहे. पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांची अडवणूक करतात. शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी भयावह आहे.
दोन्हीकडे लिकेज सरकार :सध्या जनतेचा वाली कोणी राहिलेला नाही. मध्य प्रदेशमध्ये जशी 'लाडली बहन' योजना आहे, तसं हे सरकार योजना आणणार आहे; योजना जरूर आणा, पण बहीण-भाऊ यात भेदभाव करू नका. लाडका भाऊ अशीपण योजना आणा. ह्या योजना दोघांसाठी आणा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज चंद्रकांत पाटील यांनी मला चॉकलेट दिलं. तसं योजनांचं चॉकलेट देवू नका. या सर्व योजनांचं श्रेय कृपया सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देऊ नका; कारण त्यांनी भयानक भाषण केलं होतं आणि अशा माणसाच्या हातात या योजना म्हणजे दुर्दैव. कारण यांनी आमच्या आया बहिणीवर अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केलं होतं. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार दोन्हीही हे लिकेज सरकार आहे. अयोध्याला मोठा गाजावाजा करून राम मंदिर बांधलं; परंतु पहिल्या पावसातच मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी गळत आहे आणि आजच्या महायुतीलाही गळती लागली आहे. त्यामुळे दोन्हीकडे हे सरकार लिकेज सरकार असल्याचा प्रहार उद्धव ठाकरे यांनी केला.
हेही वाचा :
- मायकल वॉनसमोर मुंबईच्या टॅक्सी चालकाकडून 'फिक्सिंग'चा सिक्सर, पाहा व्हिडिओ - Michael Vaughan
- महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा... - Maharashtra Politics
- NEET पेपर लीक प्रकरण : आरोपी जलील पठाणचा उदगीरात एक कोटीचा बंगला; दिव्यांग प्रमाणपत्रही बोगस? - NEET Paper Leak Case