नाशिक Uddhav Thackeray Kalaram Mandir Darshan : निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केलंय. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं.
काळाराम मंदिरात केली आरती : काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच उद्धव ठाकरे यांच्यावर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करण्यात आली. मंदिरात येताच प्रथम उद्धव ठाकरे यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ठाकरे कुटुंबानं प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरेंच्या हस्ते यावेळी महापूजा आणि महाआरती करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भगवे कपडे, गळ्यात रुद्राक्षाची माळ परिधान केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर : अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी (22 जानेवारी) श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याला देशभरातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरुन राजकारण तापलं होतं. सुरुवातीला उद्धव ठाकरेंना या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नाही. मात्र, आता त्यांना निमंत्रण मिळालं असल्याची माहिती आहे. दरम्यान, 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी याआधीच दिली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेत महाआरती केली.
ठाकरेंचं जंगी स्वागत : नाशिकमधील मुंबई नाका येथे उद्धव ठाकरे यांचं ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. जेसीबीच्या माध्यमातून 40 फुटांचा हार ठाकरेंना घालण्यात आला. तसेच जेसीबीमधून फुलांची उधळण देखील करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाचा जयघोष केला.
हेही वाचा -
- शिवसेना आमदार अपात्र निकाल पुन्हा न्यायालयाच्या कचाट्यात; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
- रामाचा मुद्दा निवडणुकीत वापरणार म्हणून तुमच्या का पोटात दुखतंय; संजय शिरसाटांचा टोला
- 'खोके सरकार' आल्यानंतर राज्यात एकही नवीन उद्योग नाही-आदित्य ठाकरे