ठाणे Two Year Old Gir Cataract Surgery : आपल्याला फक्त उजेड दिसला आणि बाकी काहीच दिसलं नाही तर? ही कल्पनाच किती भयावह आहे. परंतु ठाण्यातील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी अशीच एक अवघड शस्त्रक्रिया करून दोन वर्षाच्या चिमुरडीला नवीन दृष्टी मिळवून दिलीय. जन्मताच दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू असलेल्या मुलीला डॉक्टरांनी आपल्या अथक परिश्रमाने जग पाहण्याची दृष्टी दिलीय. अत्यंत कठीण असलेले हे आव्हान सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वीकारलं आणि कठीण शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली.
जन्मत:च होता मोतीबिंदू : थोडा वेळ डोळे बंद करून चालण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा तेव्हाच हे किती कठीण आहे, हे आपल्या लक्षात येईल. परंतु अशी अनेक मुले आहेत ज्यांना जन्मत:च दृष्टिहीनतेचा शाप मिळालेला असतो. अशीच एक दोन वर्षांची चिमुरडी आपल्या डोळ्यांनी फक्त उजेड पाहून आणि आवाज ऐकून खडतर जीवन जगत होती. नाशिक इगतपुरी येथील मुलीच्या दोन्ही डोळ्यांत जन्मत:च मोतीबिंदू होता. त्यामुळं उजेड आणि आवाजावरून ती आपली कामे करत होती. नाशिक शहरामध्ये केलेल्या तपासण्यावरून तिला मोतीबिंदू असल्याचं स्पष्ट झालं आणि तिच्या पालकांनी थेट ठाण्याचे सरकारी रुग्णालय गाठलं.