मुंबई Wall Collapse In Mumbai :म्हाडा इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर झाला आहे. ही घटना मुंबईतील काळबादेवीमधील चिराबाजार इथं म्हाडाच्या इमारतीच्या आवारात सोमवारी घडली. जखमी कामगारावर जी टी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप या प्रकरणात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
या दुर्घटनेबाबत कंत्राटदार आणि संबंधितावर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. - मोहितकुमार गर्ग, पोलीस उपायुक्त
संरक्षक भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू :काळबादेवीतील चिरा बाजार परिसरातील गांधी बिल्डिंग जवळ 6 ते 7 फूट उंच आणि 30 ते 35 फूट लांब संरक्षक भिंत सोमवारी दुपारी अचानक कोसळली. इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या बाजुला अन्य इमारतीचं काम चालू आहे. त्या ठिकाणी केबल टाकण्याचं काम सुरू होतं. दरम्यान, यावेळी म्हाडाच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे केबल टाकण्याचं काम करणारे 3 कामगार या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले. या घटनेची प्राथमिक माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरूवात केली. मात्र या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
म्हाडाची गांधी इमारत धोकादायक :म्हाडाची गांधी इमारत ही धोकादायक इमारतीच्या यादीत होती. काही वर्षांपूर्वी या इमारतीचं बांधकाम कोसळलं होतं. तेव्हा म्हाडानं 3 मजली इमारतीचे 2 मजले तोडले होते. एका मजल्यावर काही कुटुंब राहत होते. परंतु सुदैवानं या दुर्घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. तर मृत्यू झालेल्या दोन कामगारांमध्ये विनयकुमार निषाद (वय 30) आणि रामचंद्र सहानी (वय 30) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत. तर सनी कनोजिया (वय 19) हा गंभीरित्या जखमी झाला असून त्याच्यावर जी टी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर "या दुर्घटनेबाबत कंत्राटदार आणि संबंधितावर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे," अशी माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- अनधिकृत बांधकामाची पडली भिंत; एका मजुराचा मृत्यू, पाच जण जखमी
- स्मशानभूमीची भींत ठरली यमदूत; भींत कोसळल्यानं चार जणांचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद - Cremation Wall Collapse
- मध्यप्रदेशात मातीचं शिवलिंग बनवताना कोसळली भिंत; नऊ चिमुकल्यांचा ढिगाऱयाखाली दबून मृत्यू - Wall Collapse in Madhya Pradesh