वाशिम: वाशिम येथील स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात आली आहेत. त्यांच्या सुरक्षेकरता गजानन सैबेवार आणि राजेश वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी २४ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता स्ट्रॉंग रूम गार्ड चेक केली असता, दोन्ही पोलीस अंमलदार अनुपस्थित आढळून आले.
ईव्हीएमची जबाबदारी : निवडणुकीचा आढावा घेण्याच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी कारंजा येथील शेतकरी निवास येथे रात्री भेट दिली. त्यावेळी दोन फौजदार आणि दोन पोलीस कर्मचारी झोपलेले आढळून आले होते. यामुळं कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ निलंबित केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा वाशिम येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएमची जबाबदारी असलेले दोन पोलीस कर्मचारी अनुपस्थित असल्याचं आढळून आलं.
दोघांवर निलंबनाची कारवाई :यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ईव्हीएम मशिन वाशिम येथील कोरोनेशन हॉलमधील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या मशिनच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेले आहेत. नेमणूक केलेल्या ठिकाणावरून कुठेही जावू नये अशा स्पष्ट सूचना त्यांना दिलेल्या आहेत. परंतु असं असताना उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता स्ट्रॉंग रूम गार्ड चेक केली असता, त्यावेळी दोन्ही पोलीस अंमलदार अनुपस्थित आढळून आले. ही गंभीर बाब लक्षात घेता दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.