नेवासा (अहमदनगर) Minor Girl Rape in Newasa :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई बेल्हेकरवाडी रस्त्यावरील एका प्रार्थनास्थळात धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली दोन अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात बलात्कार, विनयभंगासह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच सोनई येथील आरोपी उत्तम बळवंत वैरागर, संजय केरु वैरागर या दोघांसह अहमदनगर टिव्ही सेंटर येथील सुनिल गुलाब गंगावणे या तीन आरोपीना पोलिसांनी अटकही केलीय.
चॉकलेटचं आमिष दाखवून बलात्कार : मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 23 ते 15 फेब्रुवारीपर्यंत सोनई बेल्हेकरवाडी रस्त्यावरील प्रार्थनास्थळात पैसे व चॉकलेटचं आमिष दाखवून तक्रारदाराच्या मुलीसह तिच्या भाचीवर आरोपी उत्तम वैरागर यानं वेळोवेळी बलात्कार करुन लैंगिक शोषण केलं. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाल्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा सोनई पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी 15 फेब्रुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीनही आरोपींना अटक करुन कलम 376, 354 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके करत आहेत.