शिर्डी Dhangar Protesters Missing: धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी नऊ दिवसांपासून नेवासा तालुक्यातील 'नेवासा फाटा' येथे उपोषण सुरू आहे. यात सहा उपोषणकर्ते उपोषणास बसलेले होते. यातील दोघांनी प्रवरा संगम येथे गोदावरी नदी पात्रात (Godavari River) जलसमाधी घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोठ्या प्रमाणात धनगर बांधव प्रवरा संगम पुलावर एकवटले आहेत. प्रशासन निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप करत रास्ता रोको करण्यात आलाय. तर NDRF च्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे. दोघांचा शोध सुरू आहे.
जलसमाधीचा दिला होता इशारा : नेवासा फाटा येथे 18 सप्टेंबरपासून सहा धनगर बांधवांचं एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू आहे. 27 तारखेला जलसमाधीचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता. त्या आधीच पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील बाळासाहेब कोळसे आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रल्हाद सोरमारे यांनी शौचालयाचं कारण सांगून उपोषण स्थळावरुन निघाले. काही वेळात इतर कार्यकर्त्यांना फोन आला. "आम्ही जल समाधी घेत आहेत, तुम्हाला शेवटचा जय मल्हार" असं म्हणत त्यांनी फोन बंद केला, तेव्हापासून हे दोघे बेपत्ता आहेत.