मुंबई Hawkers Hunger Strike : मुंबई हे धावणारं शहर आहे. या धावणाऱ्या शहरात फेरीवाले अनेकदा प्रवासावेळी अडथळा ठरतात. या संदर्भातील एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं बृहन्मुंबई महानगरपालिकेला फटकारल्यानंतर, आता पालिकेनं मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
फेरीवाल्यांचं उपोषण : यातील अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाले कोणते आणि किती हा नवा वाद समोर आलाय. या संदर्भात पालिकेने एक सर्वेक्षण देखील केलं होतं. मात्र, या सर्वेक्षणात ज्यांची नोंद पालिकेने केली त्यांना देखील या अतिक्रमण विरोधी मोहिमेत पालिकेनं हटवल्यानं मुंबईतील फेरीवाले आक्रमक झाल्याचं चित्र आहे. पालिकेच्या या कारवाईविरोधात लालबाग येथे फेरीवाला विक्रेता संघाने उपोषण पुकारलं आहे. शुक्रवारपासून हे फेरीवाले उपोषणाला बसले आहेत.
फुटपाथवर साखळी उपोषण सुरू : मुंबईच्या लालबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने 24 जून रोजी कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल 138 फेरीवाल्यांना हटवण्यात आलं. मात्र, आता 40 दिवस उलटल्यानंतर देखील आपल्याला व्यवसाय करता येत नसल्यानं, लालबाग फेरीवाला विक्रेता संघाने शुक्रवारपासून जिथे ते आपला व्यवसाय करतात, तिथेच फुटपाथवर साखळी उपोषण सुरू केलं. मागील 40 वर्षांपासून इथे व्यवसाय करत असल्याची माहिती काही उपोषणकर्त्यांनी दिली.
न्यायालयात घेणार धाव : या संदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना लालबाग फेरीवाला विक्रेता संघाचे सेक्रेटरी हेमराज परब म्हणाले की, "मागची 40 वर्षे आम्ही इथे व्यवसाय करत आहोत. पालिकेने 2016 मध्ये आमचं सर्वेक्षण देखील केलंय. आता पालिकेने आम्हाला तीन दिवसाची नोटीस देऊन आमच्या पोटावर पाय दिला आहे. केंद्र सरकारने फेरीवाला धोरण अंतर्गत स्त्री-वेंडर्सना एक लाखापर्यंतचं कर्ज देखील जाहीर केलं. आमच्यातील काही फेरीवाल्यांना हे कर्ज मिळालं. मात्र, केंद्र सरकारनं दिलेले हे कर्ज आता फेडायचं कसं हा आमच्या समोर प्रश्न आहे. पालिकेने आमचा व्यवसाय पुन्हा सुरू करू न केल्यास आपण न्यायालयात धाव घेणारआहोत."