छत्रपती संभाजीनगर :खेळताना कठडा नसलेल्या विहिरीत पडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना आडूळ इथं घडली. आईसोबत विहिरीजवळ गेले असताना ही दुर्घटना घडली. जय कृष्णा फणसे (वय 10) आणि प्रणव कृष्णा फणसे (वय 6) असं मृत झालेल्या मुलांची नावं आहेत. गावकरी आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांनी घटनास्थळीच आक्रोश केला.
दोन भावंडांचा झाला मृत्यू :पैठण तालुक्यातील आडुळ इथं मंगळवारी शाळकरी सख्ख्या भावांचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. जय कृष्णा फणसे आणि प्रणव कृष्णा फणसे अशी मृत मुलांची नावं आहेत. आडुळ येथील चौथीमध्ये शिकत असलेला जय फणसे आणि पहिलीमध्ये शिकत असलेला प्रणव फणसे हे 2 सख्खे भाऊ आपल्या आईसोबत जमवाडी परिसरातील रजापूर शिवारातील विहिरीवर गेले होते. यावेळी कठडे नसलेल्या विहिरीमध्ये दोघं पडून त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विहिरीला कठडे नसल्यानं दुर्घटना घडली. त्यामुळे अशा विहिरींना सुरक्षीत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.