मुंबई-टीव्ही अभिनेता अमन जैस्वालचा शुक्रवारी मुंबईतील जोगेश्वरी भागात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. केवळ वयाच्या २३ व्या वर्षी अभिनेत्याचा अपघाती मृत्यू झाल्यानं मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
टीव्ही मालिका 'धरतीपुत्र नंदिनी'मध्ये अभिनेता अमन जैस्वालनं मुख्य भूमिका साकारली होती. मोटारसायकलवरून ऑडिशनसाठी जात असताना ट्रकनं त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अमनला बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अमन जैस्वाल हा उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी होता. त्यानं करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. यानंतर त्यानं टीव्ही इंडस्ट्रीजमधून नवीन करियरला सुरुवात केली. त्यानं विविध मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. २०२३ मध्ये ‘धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही मालिकेतील प्रमुख भूमिकेमुळे त्यानं खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला.
- अभिनेता अमनच्या अकाली निधनानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पोलिसांनी अपघातामधील ट्रक जप्त केला आहे. चालकाविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.