नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यातील प्रमुख म्हणजे 'शेती व्यवसाय' आहे. मिरची, मका, गहू, बाजरी आणि कापूस ही प्रामुख्यानं पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मात्र, यातून शेतीला जोडधंदा म्हणून काही शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, दूध व्यवसाय सुरू केलाय. यावर मात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भवरे आदिवासी वस्तीतील शेतकरी 'योहान अरविंद गावित' यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार सन्मानित: पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी योहान गावित यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायातून असामान्य यश प्राप्त केलंय. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२५) त्यांना राजधानी दिल्ली येथे सन्मानित करण्यात येणार आहे. आदिवासी युवकाच्या या सन्मानामुळं जिल्ह्याचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे.
गावातून दिल्लीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास : भवरे गावात राहणाऱ्या योहान गावित यांनी आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत शासनाकडून ६० टक्के अनुदान मिळवलं. या योजनेतून त्यांना १८ पिंजरे उभारण्यासाठी सुमारे ३२.४० लाख रुपयांचं अनुदान मंजूर झालं. गावित यांनी या आर्थिक सहाय्याचा योग्य तो उपयोग करत आपल्या गावातील तलावात अत्याधुनिक पद्धतीनं मत्स्यपालन सुरू केलं.
मत्स्य व्यवसायातील आधुनिकता आणि सामाजिक दृष्टीकोन: योहान गावित यांनी मत्स्यपालन व्यवसायाला फक्त आर्थिक उपजीविकेपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर या व्यवसायातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम बनवलं. त्यांनी आपल्या पिंजऱ्यांमध्ये मत्स्यबीज तयार करुन ते शेतकऱ्यांना पुरवलं. याशिवाय, मत्स्यपालनासाठी लागणारे साहित्य पुरवून शेतकऱ्यांच्या व्यवसायिक गरजा भागवल्या. आज त्यांच्या या कामामुळं भवरे गाव आणि परिसरातील अनेक शेतकरी मत्स्य व्यवसायाकडं वळले आहेत. योहान गावित यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर केंद्र शासन स्तरावरही झाली. महाराष्ट्र राज्याचे सहआयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग यांनी त्यांच्या प्रकल्पाची पाहणी करुन केंद्र शासनाला सादर केलेल्या अहवालात या प्रकल्पाचं यश अधोरेखित केलं. यानुसार, केंद्र शासनानं त्यांची निवड करून प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. नुकतेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनीही या प्रकल्पाला भेट देवून योहान गावित यांचं कौतुक केलं.