अमरावती Lok Sabha Election 2024 : देशभरात आज लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान सुरू आहे. मात्र अमरावतीतील मेळघाटात मतदारांना कोणत्याच सुविधा नाहीत. त्यामुळे मेळघाटातील चार गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यात धारणी तालुक्यात येणाऱ्या रंगूबेली, धोकडा, कुंड आणि खामदा या अतिदुर्गम गावातील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. आज अमरावती लोकसभा मतदारसंघात सर्वत्र मतदान प्रक्रिया राबविली जात असताना या चार गावातील ग्रामस्थांनी मतदान करण्यास नकार दिला.
गावांमध्ये कुठल्याही सुविधा नाहीत :सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटात अतिदुर्गम भागात वसलेल्या या चारही गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारे रस्ते नाहीत. या गावात कुठलं वाहन देखील पोहोचू शकत नाही, अशी अवस्था आहे. यासह वीज पुरवठा या चारही गावांमध्ये नाही, पिण्याचं पाणी देखील नाही. यासह आरोग्य सेवा देखील या गावांमध्ये उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडं अनेकदा तक्रारी आणि निवेदनं सादर करून देखील गावाच्या कुठल्याही प्रश्नांसंदर्भात कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे या चारही गावातील ग्रामस्थांनी "आज आम्ही मतदान करणार नाही, आमचा निवडणुकीवर बहिष्कार आहे," अशी भूमिका घेतली आहे.