अमरावती Melghat Tribal Boy :रोज सकाळी उठून दुरुन पाणी भरुन आणणं, घर झाडणं, आवरणं, घराच्या अंगणात असणाऱ्या झाडांची काळजी घेणं, स्वतःचे कपडे धुण्यासह भांडी घासणं अशी घरातील सर्व कामं आटोपल्यावर तयारी करुन शाळेत जाणं. गत दोन वर्षांपासून अवघं तेरा वर्षे वय असणाऱ्या चिमुकल्या जिगरचा हा नित्यक्रम. त्याचं घर सर्वसाधारण गावातलं नाही, तर मेळघाटच्या जंगलात वसलेल्या जैतादेही या अतिशय छोट्या गावातील आहे. गावात रोजगार उपलब्ध नसल्यानं त्याचे आई, वडील आणि दोन बहिणी मेळघाटपासून लांब नाशिक आणि पुण्याकडं कामाला गेलेत. दिवाळीला किंवा थेट होळीलाच ते सारे घरी परतणार. इतके दिवस जिगर मात्र घरी एकटाच. या चिमुकल्या जीवाला त्याच्या शाळेतील शिक्षक, गावातच राहणारी आत्या आणि त्याच्यासारखेच चिमुकले मित्र यांचा बऱ्यापैकी आधार. मेळघाटच्या जैतादेही सारख्या इतर अनेक गावात अशी अनेक लहान मुलं आई-वडील रोजगारानिमित्त बाहेर असल्यामुळे घरात एकटीच असतात. अतिशय दुर्गम भागात आणि घनदाट जंगलात एकटं राहण्यासाठी खरंच मोठी 'जिगर' हवी. या जिगरबाज चिमुकल्यांच्या संघर्षावर 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.
अशी आहे जिगरची कहाणी :जैतादेही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या जिगर धिकर असं या धाडसी चिमुकल्याचं नाव आहे. जिगरला तीन मोठ्या बहिणी आहेत. सर्वात मोठी बहीण ही आश्रम शाळेत शिकायला आहे, तर इयत्ता आठवीत असणाऱ्या दोघी जुळ्या बहिणी या गावात असणाऱ्या एका संस्थेच्या शाळेत आहेत. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन्ही बहिणी आई-वडिलांसोबत शाळा सोडून कामासाठी गेल्या आहेत. जिगर हा घरी सध्या एकटाच राहतो. गावातच राहणारी त्याची आत्या त्याची काळजी घेते. जिगर शाळेतून आल्यावर दिवसभर त्याच्या घरात असतो. शाळेत दुपारी दोन वाजता मिळणारं मध्यान भोजन हा जिगरसाठी मोठा आधार. 'रविवारी शाळेला सुट्टी असली की मी स्वतः घरी खिचडी वगैरे चुलीवर शिजवतो, तर कधी आत्याकडं जेवायला जातो' असं जिगर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाला.
मित्रांची लाभत आहे साथ :शाळेत सोबत शिकणारे गावातील मित्र जिगरच्या घरी येतात. सायंकाळी सर्व मित्र मस्त खेळतात. त्यांच्यात चांगल्या गप्पा देखील रंगतात. जिगर सारखीच परिस्थिती त्यांच्या मित्रांची देखील आहे. सध्या एक दोन मित्रांचे आई-वडील गावात असले, तरी दिवाळीनंतर ते देखील कामानिमित्त बाहेर जाणार आहेत. अनेक चिमुकल्यांचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेल्यावर त्यांच्यासोबत आजी -आजोबा घरात असतात. जिगर सारखी मोजकी मुलं मात्र आई, वडील हे दोघंही कामानिमित्त दूर गेल्यावर आपलं घर आणि स्वतःला एकटेच सांभाळतात. विशेष म्हणजे या चिमुकल्यांना अगदी लहान वयातच चुलीवर स्वयंपाक देखील करता येतो.