अमरावती : पयोष्णी पुराणांमध्ये महत्त्वपूर्ण उल्लेख असणाऱ्या पूर्णा नदीच्या काठावर चांदूरबाजार तालुक्यात येणाऱ्या 'ब्राह्मणवाडा थडी' गावात पौष रविवारी परिसरातील अनेक भाविकांची गर्दी उसळते. ज्यांना नवसानं मूलबाळ होतात, असे दांपत्य पौष महिन्याच्या अखेरच्या रविवारी पूर्णा नदीच्या पात्रात लाकडाचा पाळणा (Wooden Cradle) सोडून नवस फेडण्याची परंपरा या ठिकाणी आहे. नदीच्या पात्रात गंगामातेचं फार जुनं मंदिर आहे. पौष महिन्यात भाविक गंगामाईच्या दर्शनाकरिता शेकडो वर्षांपासून याठिकाणी येण्याची परंपरा आहे. एकूणच या पूर्णा नदी संदर्भात धार्मिक आणि तिच्या प्रवाहाबाबत माहिती देणारा 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
ग्रामदेवता गंगामाईच्या मंदिराचं वैशिष्ट्य: थडी याचा अर्थ होतो काठ. ब्राह्मणवाडा हे गाव पूर्णा नदीच्या काठावर वसल्यामुळं 'ब्राह्मणवाडा थडी' म्हणून ओळखलं जाते. या नदीच्या पात्रात शेकडो वर्षांपासून दगडाच्या एका उंच भागावर गंगामाईचं मंदिर आहे. या मंदिराचा दीड-दोनशे वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला, तरी हे मंदिर आज देखील नदीच्या पात्रातच आहे. मूलबाळ होण्यासाठी गंगामाईला नवस बोलण्याची प्रथा या परिसरातील अनेक गावामध्ये आहे. ज्यांना लग्नानंतर लवकर मूल झालं नाही, अशा अनेकांनी या ठिकाणी नवस केल्यावर त्यांना बाळ झालं आहे. "बाळ झाल्यावर नवस फेडण्यासाठी पौष महिन्याच्या अखेरच्या रविवारी नदीच्या पात्रात लाकडाचा पाळणा सोडण्याची प्रथा अनेक काळापासून याठिकाणी सुरू आहे. आता हे प्रमाण काहीसं कमी झालं असलं, तरी अनेक जण पौष महिन्याच्या अखेरचा रविवारी नदीच्या पात्रात लाकडाचा पाळणा सोडतात. पौष महिन्याच्या अखेरच्या रविवारी नदीच्या पात्रात लाकडाचा पाळणा सोडण्याला या ठिकाणी अधिक महत्त्व दिलं जाते," अशी माहिती, ब्राह्मणवाडा थडी येथील रहिवासी सुरेश बदुकले आणि शिवा काळे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
पुरातही मंदिर सुरक्षीत : पूर्णा नदीच्या पात्रात असणारं गंगामाईचं मंदिर हे नदीला कितीही पूर आला, तरी अगदी सुरक्षीत राहते. "2014 मध्ये नदीला महापूर आला आणि पुराचं पाणी संपूर्ण गावात शिरलं. त्यावेळी मंदिराचा कळस तेवढा दिसत होता. गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, असं असताना पूर ओसरल्यावर या मंदिरात शेकडो वर्षांपासून असणाऱ्या दगडाच्या छोट्या मूर्ती या जागेवरुन हल्ल्या देखील नाहीत. नदीच्या पात्रात असणाऱ्या इतर मंदिरांना मात्र काहीसं नुकसान झालं. गंगामाईच मंदिर मात्र पूर्णतः शाबूत राहीलं. या घटनेनंतर गावातील नव्या पिढीसह प्रत्येकाचा गंगामाईवरचा विश्वास अधिक दृढ झाला," असं ब्राम्हणवाडा थडी येथील ग्रामस्थ मोहन रेखाते यांनी सांगितलं.
सातपुडा पर्वतात पूर्णा नदीचा उगम :सातपुडा पर्वतामध्ये मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून पूर्णा नदीचा उगम होतो. या नदीचं प्राचीन नाव पयोष्णी असं आहे. मध्य प्रदेशातून ही नदी सातपुडा पर्वतरांगेतून पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात प्रवेश करते. ब्राह्मणवाडा थडी या ठिकाणी या नदीचं भव्यपात्र पाहायला मिळते. ही नदी पश्चिमेकडं वाहते. तापी नदीला समांतर वाहणारी ही नदी अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर, बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद या तालुक्यातून जळगाव जिल्ह्यात चांगदेव इथं तापी नदीत मिळते.