महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरातील 21 दिवसाचा 'पेढा गणपती'; बोंबाडे कुटुंबीयांनी जपली चार दशकांची परंपरा - Ganesh Visarjan 2024

Ganesh Visarjan 2024 : कोल्हापूरात गणेशोत्सव दिमाखात साजरा केला जातो. तर शुक्रवारी (27 सप्टेंबर) रोजी 'पेढा गणपती'चं विसर्जन केलं जाणार आहे. शहरातील बोंबाडे कुटुंबीयांच्या या बाप्पाला 4 दशकांहून अधिकची परंपरा आहे.

Ganesh Visarjan 2024
२१ दिवसाचा पेढा गणपती (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 10:48 PM IST

कोल्हापूर Ganesh Visarjan 2024 : घरोघरी 5 दिवसांसाठी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होतं. मात्र, दिलबहार तालमीजवळील सणगर गल्लीमधील 'शरद बोंबाडे' यांच्या घरी 21 दिवसांसाठी बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. बोंबाडे यांच्या घरच्या बाप्पांना पेढे प्रिय आहेत, तर मूर्ती साकारणाऱ्या कुंभाराला मानाचा आहेर, धान्य दिलं जातं. त्यामुळं या बाप्पाला धान्यावरचा 'पेढा गणपती' (Pedha Ganpati) म्हणून ओळखला जातो. तर समाजातील बारा बलुतेदार या गणपतीची 21 दिवस मनोभावे पूजा करतात. यामुळं 21 दिवसांच्या या उत्सवातून सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला जातो.

4 दशकांहून अधिकची परंपरा : मांगल्याचं प्रतीक असलेल्या लाडक्या गणरायाचा 11 दिवसांचा गणेशोत्सव पार पडला. मात्र, अनंत चतुर्दशीनंतर कोल्हापूरमधील गणेश भक्तांची पावले मंगळवार पेठेतील पेढा गणपतीच्या दर्शनासाठी वळतात. या बाप्पांची 21 दिवसांसाठी प्रतिष्ठापना केली जाते. बोंबाडे कुटुंबीयांच्या या बाप्पाला 4 दशकांहून अधिकची परंपरा आहे. बोंबाडे यांच्या भावकीत एकच मातीची गणेशमूर्ती होती. त्या कुटुंबांस वारस नसल्यानं ती मातीची गणेशमूर्ती शरद बोंबाडे यांच्या घरी आली. कुटुंबीयांकडून गणेशोत्सवाची सुरुवात झाली. मात्र बाप्पांनी दिलेल्या दृष्टांतामुळं मूर्तीची प्रतिष्ठापना 5 ऐवजी 21 दिवसांसाठी केली जाऊ लागल्याचं शरद बोंबाडे सांगतात.

प्रतिक्रिया देताना शरद बोंबाडे (ETV Bharat Reporter)

इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात : गणेश प्रतिष्ठापनेसह विसर्जनापर्यंत विविध परंपरा आहेत. त्यामध्ये विविध मानकऱ्यांना मान आहे. गणेश आगमनाप्रसंगी कुंभारास आहेर आणि धान्य दिलं जातं, तर मुस्लीम भाविकांच्या गाड्यावरून मूर्तीचं आगमन होतं. विसर्जनावेळी अन्य कुटुंबियांतील गणपती तीनवेळा पाठीमागे वळून पाहतात. तर पेढा गणपती मात्र, पाचवेळा मागे वळून पाहतो. बाप्पांची ही आकर्षक गणेशमूर्ती सव्वातीन फूट उंचीची आहे. महेश वडणगेकर हे मूर्ती साकारतात, वडणगेकर यांची ही तिसरी पिढी आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक या राज्यातून भाविक पेढा गणपतीच्या दर्शनासाठी येतात.



पेढा गणपती अशी ओळख : बोंबाडे यांच्या घरच्या गणोबास 'पेढा गणोबा' म्हणून, तर गणपतीस 'महागणपती' म्हणून ओळखले जाते. भाविकांकडून मोठ्या प्रमाणात गणपतीला पेढे अर्पण केले जातात. या पेढ्यांचा ढीग बाप्पांच्या मूर्तीएवढा होतो. त्यामुळं या गणपती बाप्पांची ओळख ही 'पेढा गणपती' म्हणून रूढ झाली.



12 बलुतेदार आणि सेवेकरांची मनोभावे: बोंबाडे यांच्या घरातील 21 दिवसांच्या पेढा गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे या काळात बारा बलुतेदारांना या कुटुंबाकडून सन्मान दिला जातो. तर 29 जणांचं सेवेकरी मंडळ लाडक्या बाप्पाची सेवा करतात. स्वागत आणि विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांमध्ये काढली जाते. 21 दिवसांच्या या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दुपारी मोठी गर्दी होते. विसर्जन मिरवणुकीला आझाद चौकापासून सुरुवात होते तर मिरजकर तिटकटीपासून पारंपरिक मार्गावरून लाडक्या पेढा गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. शुक्रवारी (27 सप्टेंबर) रोजी या पेढा गणपतीचं विसर्जन होणार आहे.

हेही वाचा -

  1. 'मुंबईचा राजा' गणपती बाप्पाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन; आतापर्यंत 19,996 गणपती बाप्पाला भाविकांचा निरोप - Ganesh Visarjan 2024
  2. पुण्यात दुसऱ्या दिवशीही विसर्जन मिरवणूक सुरू, पहा ड्रोन व्हिडिओ - pune ganesh visarjan 2024
  3. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; बॅरिकेड तोडून 'पंचगंगा घाट' गणपती मूर्ती विसर्जनासाठी केला खुला - Ganeshotsav 2024

ABOUT THE AUTHOR

...view details