अमरावती Tiger terror in Chirodi Malkhed :अमरावती शहरालगत असलेल्या पोहरा मालखेड जंगलात गेल्या काही दिवसांपासून वाघ असल्याचा दावा नागरिकांनी केलाय. चांदूर रेल्वे वन परिमंडळांतर्गत येणाऱ्या चिरोडी मालखेड या गावातील जंगलात वाघांचा वावर असल्यानं वनविभागानं ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा वाघानं या परिसरात मुक्काम केला ठोकला आहे. गेल्या 13 वर्षांत वाघ दिसण्याची ही सलग पाचवी घटना आहे.
- गावामध्ये भीतीचं वातावरण : पोहरा मालखेडच्या जंगलात वाघ दिसल्यानंतर वनविभागानं पोहरा, चिरोडी, मालखेड या गावांमध्ये गावकऱ्यांना इशारा देण्यासाठी पोस्टर लावलं आहे. विशेष म्हणजे या गावातील अनेकांना रात्रीच्या वेळी जंगल परिसरात तसंच मुख्य रस्त्यावर वाघ दिसल्यानं या गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गुराखी धास्तावले :मालखेड, पोहरा, राजुरा, चिरोडी, कार्लासारख्या जंगली गावात अनेक लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीसह पशुपालन आहे. त्यामुळं या गावांतील गुराखी आपल्या जनावरांना चरण्यासाठी घेऊन वनक्षेत्रात जातात. मात्र, आता जंगलात वाघ आल्यानं गुराख्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळं ते आपल्या जनावरांची विशेष काळजी घेत आहेत. मालखेड वनपरिक्षेत्रात वाघांनं गायीची शिकार केल्यानं या भागातील गुराखी सावध झाले आहेत.
वाघाचं जंगलात कायम वास्तव्य नाही : पोहरा मालखेड आणि शिरोडी जंगल परिसरात यापूर्वी 2011, 2016, 2018, 2021 आणि आता 2024 मध्ये रहिवाशांना वाघ दिसला. वनविभागाचं पथक जंगलात गस्त घालून सतत वाघावर लक्ष ठेवत आहे. या जंगलात 13 वर्षात पाच वेळा वाघ दिसलाय. मात्र, वाघाचं या जंगलात कायम वास्तव्य नसल्याचं राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. 1992 पासून पोहरा मालखेड जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळावा, यासाठी मागणी होत आहे.