पुणे Jayant Patil On BJP : "आगामी विधानसभा निवडणूक 2024 ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आता सत्ताधारी पक्षात राम राहिला नाही. आता राम आपल्या बाजूला आहे. जिथं राम आहे, तिथं त्यांचे उमेदवार पडले आहेत. त्यामुळे ही विधानसभा जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातून भाजपा घालवा, एकदा महाराष्ट्र आपण जिंकला की दिल्लीतील मोदी सरकार घालवायला वेळ लागणार नाही," असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. शिवस्वराज्य यात्रेत दौंड तालुक्यातील पाटस इथं सभा झाली, यावेळी ते बोलत होते.
कूटनीती करुन अनेक नेत्यांना कारागृहात डांबण्याचं राजकारण :"आमची लढाई भाजपा सोबत आहे. महाराष्ट्रात कूटनीती करुन अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचं राजकारण सूरु आहे. या कूटनीती विरोधात आम्ही आहोत. इथल्या जनतेनं 32 खासदार भाजपा विरोधात निवडून दिले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना घेऊन सरकार स्थापन करायची वेळ आली. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आता एनडीए सरकार म्हणायला लागले आहेत," अशी टीका जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे. "गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवस्वराज्य यात्रा काढली, तेव्हा लोक म्हणायचे 20 आमदार येतील. मात्र आमचे 54 आमदार निवडून आले. आता लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राला समजलं आहे की शरद पवार नावाची जादू काय आहे. सगळे पुढारी होते, तेव्हा 4 खासदार होते. आता सगळे झाडून निघून गेले. हे गेलेले सगळे म्हणायचे यांचा 1-2 खासदार निवडून येईल, परंतु 8 खासदार निवडून आले. शरद पवार यांना फसवल्याची भावना जनेतेत आहे. 2 मराठी माणसांचे पक्ष यांनी फोडले. यामुळे जनतेत रोष आहे," असंही जयंत पाटील यांनी बोलताना सांगितलं.