पुणे Dagdusheth Bappa darshan : लाडक्या बाप्पाचे दर्शन उत्सवमंडपात जाऊन घ्यावे, ही प्रत्येक गणेशभक्ताची इच्छा असते. मात्र, आजारपणामुळे अंथरुणावर असलेल्या रुग्णांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन आणि आरती ससून रुग्णालयातील रुग्णांना ते आहेत त्या विभागामध्ये, त्यांच्या खाटेवर बसून करण्याचा आनंद देण्याची सुविधा 'व्हर्च्युअल रिअॅलिटी'च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उत्सवाच्या १३२ व्या वर्षी 'व्हर्च्युअल रिअॅलिटी स्टार्टअप-डिजिटल आर्ट व्हीआरई' या माध्यामातून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. डिजिटल आर्ट व्हीआरईचे संस्थापक संचालक अजय पारगे यांची ही संकल्पना आहे.
आजारपणामुळे रुग्णालयातील खाटेवरुनकुठेही जाता न येणाऱ्या रुग्णांना गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा असते. मात्र, इच्छा असूनही त्यांना विविध आजारांशी झुंज देत रुग्णालयात राहून केवळ मनामध्ये गणरायाचे रुप साठवावे लागते. अशा रुग्णांना 'व्हर्च्युअल रिअॅलिटी'द्वारे आपण प्रत्यक्षपणे उत्सवमंडपात आहोत आणि गणरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असल्याचा भास त्यांना होत आहे. तसंच आरती करत असल्याचा आनंद देखील रुग्णांना मिळत आहे. या दर्शनाचा आनंद घेताना अनेक रुग्णांना आनंदाश्रू अनावर झाले. आपण लवकर बरे व्हावे, यासाठी रुग्णांनी प्रार्थना देखील केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, 'व्हर्च्युअल रिअॅलिटी' द्वारे दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेण्याची संधी रुग्णांना उपलब्ध होत आहे. यामुळे रुग्णांना वेगळी ऊर्जा आणि समाधान मिळणार असून बाप्पाचा हा दर्शनरुपी प्रसाद, ट्रस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मागील चार वर्षांपासून सातत्याने आम्ही हा उपक्रम ससून रुग्णालयामध्ये राबवत आहोत. त्याला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा..
- दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर सत्ताधारी मंत्री अन् विरोधी पक्षनेत्यांची गळाभेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 'स्त्री शक्ती'चा जागर; 35 हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण अन् महाआरती
- 'दगडूशेठ'च्या जटोली शिवमंदिर प्रतिकृती विद्युत रोषणाईचं उद्घाटन, पाहा ड्रोन व्हिडिओ