नवी मुंबई Building Collapse In New Mumbai : जुनी तीन मजली अनाधिकृत इमारत कोसळल्यानं नवी मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील बेलापूरजवळील शाहाबाज गावात ही घटना शनिवारी पहाटे घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. या इमारतीत तब्बल 26 कुटुंब राहत असून इमारत कोसळली तेव्हा दोन नागरिक आत अडकले होते. अग्निशमन दलानं या दोन्ही नागरिकांना बाहेर काढलं, मात्र यातील एकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पीडितांना तत्काळ मदत देण्याचे आदेश महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांना दिले.
नवी मुंबईतील तीन मजली इमारत कोसळली :नवी मुंबईतील बेलापूर इथल्या शाहाबाज गावातील 15 ते 16 वर्ष जुनी अनाधिकृत इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका नागरिकाचा मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. नवी मुंबईतील बेलापूर इथल्या शाहाबाज गावात सेक्टर 19 इथं हनुमान मंदिर जवळ जी+3 ही बिल्डिंग कोसळली आहे. या इमारतीमध्ये दोन नागरिक अडकले होते. त्यांना काढण्यासाठी घटनास्थळी सीबीडी अग्निशमन दल आणि वॉर्ड ऑफिसमधील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी शोध कार्य करण्यात आलं. अडकलेल्या दोन्ही व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. अजून कोणी अडकलेलं आहे की, नाही याची खात्री करण्यात आली. तेथील स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार अजून एक जण आतमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बचाव पथक घटनास्थळी तळ ठोकून होतं. या इमारतीत एकूण 26 कुटुंब राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.