संघाच्या तीन दिवसीय बैठकीविषयी माहिती देताना प्रतिनिधी सुनील आंबेकर नागपूरRSS Meeting Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या ९९ वर्षांपासून सामाजिक संघटना म्हणून काम करत आहे. पुढल्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत शताब्दी वर्षाच्या कृती आराखड्याच्या संदर्भात हे विचारमंथन होणार आहे. याशिवाय यावर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बैठकीत त्या अनुषंगाने देखील विचारमंथन होणार आहे.
सभेत मांडले जाणार पाच प्रस्ताव :स्मृती भवन परिसरात १५ ते १७ मार्च दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. प्रतिनिधी सभेमध्ये संघटन आणि संबंधित संघटनांचा वर्षभराच्या कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. तर पुढील कामाचं नियोजनसुद्धा यामध्ये होणार आहे. येणाऱ्या लोकसभेच्या दृष्टिकोनातून ही प्रतिनिधी सभा अतिशय महत्त्वाची अशी समजली जात आहे. प्रतिनिधी सभेमध्ये पाच प्रस्तावसुद्धा पारित केले जाणार आहे. पुढील वर्षी संघाचं शताब्दी वर्ष असल्यानं त्यासंबंधीचं नियोजनसुद्धा या प्रतिनिधी सभेत केलं जाणार आहे. यासंदर्भात अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी माहिती दिली.
१५२९ प्रतिनिधींची उपस्थिती असेल :या बैठकीमध्ये संपूर्ण देशातून १५२९ प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षित आहे. या बैठकीत ३२ संघप्रणित संघटना आणि काही गटांचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालक शांताक्का, विश्व हिंदू परिषदेचे अलोक कुमार उपस्थित राहणार आहेत. सर्व संस्था देशभरात सुरू असलेली आपापली विविध कामं आणि त्या भागातील विविध समस्या सोडविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती देतील.
सरकार्यवाहांच्या निवडीची प्रक्रिया :२२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या अभिषेकाने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐतिहासिक घटना भारतीय दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून यासंदर्भातील एक प्रस्ताव हा लोकप्रतिनिधी सभागृहात आणला जाणार आहे. या बैठकीत संघाचे सरकार्यवाह निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सरसंघचालकांच्या देशव्यापी मुक्कामाची योजनाही अंतिम केली जाईल. या शिवाय समाजहिताच्या दृष्टीने बदल घडवून आणण्यासाठी व्यापक विचार केला जाईल.
९९ वर्षांचा संघ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गेल्या ९९ वर्षांपासून सामाजिक संघटना म्हणूनचं काम करत आहे. पुढल्या वर्षी २०२५ विजयादशमीला संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. २७ सप्टेंबर १९२५ साली केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तो दिवस विजयादशमीचा होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक हिंदुत्ववादी सामाजिक व कौटुंबिक संघटना आहे. देशातील सर्वांत मोठे सामाजिक संघटन म्हणूनसुध्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख होतो.
भाजपाच्या दृष्टीनं महत्त्वाची बैठक : आगामी काळात देशात लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे भाजपाच्या दृष्टीनं संघाची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भाजपाला कायमच संघाचे पाठबळ मिळत आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीनं संघ प्रचारकांकडून भाजपाला मार्गदर्शनही केलं जाऊ शकतं; मात्र यासंदर्भात अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
हेही वाचा :
- Lok Sabha Election 2024 :पंतप्रधानांच्या नावावरच निवडणुका लढवायच्या, तर शिंदे, पवारांना जास्त जागा का द्यायच्या ; 'संघा'चा भाजपा पक्षश्रेष्ठींना सवाल ?
- Honey Trap Case : बारामतीच्या डॉक्टरवर प्रेमाचं जाळं : खंडणीसाठी अपहरण करुन घेतला 'इतक्या' लाखांचा चेक
- Yodha Advance Booking: 'योद्धा'ची आगाऊ बुकिंग सुरू; निर्मात्यांनी केला नवा टीझर रिलीज